Maharashtra Elections Results 2024: मुंबईत दहा केंद्रांवर होणार मतमोजणी; परिसरात कडक पोलीस बंदोबस्त, जाणून घ्या कशी आहे तयारी

प्रत्येक टेबलवर एक सूक्ष्म निरीक्षक, एक मतमोजणी पर्यवेक्षक, एक मतमोजणी सहाय्यक आणि एक शिपाई असे अधिकारी, कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत.

Maharashtra Elections Results 2024 (संग्रहित संपादित प्रतिमा)

Maharashtra Elections Results 2024: मुंबई शहर जिल्ह्यातील दहा विधानसभा मतदारसंघांची मतमोजणी २३ नोव्हेंबर २०२४ रोजी दहा वेगवेगळ्या मतमोजणी केंद्रांवर होणार आहे. मतमोजणीसाठी मुंबई शहर जिल्हा निवडणूक प्रशासन सज्ज असल्याची माहिती मुंबई शहर जिल्हाधिकारी तथा अतिरिक्त जिल्हा निवडणूक अधिकारी संजय यादव यांनी दिली. मतदान केंद्रांवरील आवश्यक त्या सोयीसुविधा व उपाययोजनांबाबत मुंबई शहर जिल्हाधिकारी तथा अतिरिक्त जिल्हा निवडणूक अधिकारी संजय यादव, संबंधित विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी हे पाहणी करुन सातत्याने आढावा घेत आहेत. मतमोजणी परिसरात कडक पोलीस बंदोबस्त राहणार आहे. उमेदवारांचे मतमोजणी प्रतिनिधी, मतमोजणीसाठी नियुक्त अधिकारी, कर्मचारी यांना मतमोजणी केंद्रामध्ये मोबाईल व इतर कोणत्याही इलेक्ट्रॉनिक वस्तू नेण्यास मनाई करण्यात आली आहे. प्रवेशद्वारावर याबाबतची तपासणी करूनच मतमोजणी केंद्रामध्ये प्रवेश देण्यात येणार आहे.

मतदान यंत्रातील (ईव्हीएम) मतमोजणीसाठी प्रत्येक विधानसभा मतदारसंघाच्या मतमोजणी केंद्रावर स्वतंत्र मतमोजणी कक्ष तयार करण्यात आले असून प्रत्येक कक्षामध्ये १४ टेबलवर मतमोजणी होणार आहे. प्रत्येक टेबलवर एक सूक्ष्म निरीक्षक, एक मतमोजणी पर्यवेक्षक, एक मतमोजणी सहाय्यक आणि एक शिपाई असे अधिकारी, कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. तसेच टपाली मतमोजणीसाठी वडाळा, माहिम आणि वरळी विधानसभा मतदारसंघासाठी प्रत्येकी ०५ टेबल, भायखळा आणि कुलाबा विधानसभा मतदारसंघासाठी प्रत्येकी ०४, धारावी, शिवडी आणि मलबार हिल विधानसभा मतदारसंघासाठी प्रत्येकी ०३ टेबल तर सायन कोळीवाडा आणि मुंबादेवी मतदारसंघासाठी प्रत्येकी ०२ असे एकूण ३६ टेबल असतील. सेवा मतदारांच्या पुर्वमतमोजणीसाठी जिल्ह्यातील १० विधानसभा मतदारसंघासाठी प्रत्येकी एक असे एकूण १० टेबल असतील.

सकाळी ०८ वाजता निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या समक्ष टपाली मतमोजणीला सुरुवात होईल. त्यानंतर सहायक निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या समक्ष संबंधित विधानसभा क्षेत्रातील मतदान यंत्रावरील मतमोजणीला सुरुवात होईल. प्रत्येक टेबलवर उमेदवारांनी नियुक्त केलेल्या मतमोजणी प्रतिनिधींना त्या टेबलवर कोणकोणत्या मतदान केंद्रावरील मतमोजणी होणार आहे, याबाबत माहिती देणारे फलक मतमोजणी कक्षात लावण्यात आले आहेत. मतमोजणी केंद्र परिसरात प्रवेश करताना पोलिसांकडून प्रत्येक व्यक्तीची तपासणी केली जाणार असून अधिकृत पास असल्याशिवाय कोणालाही प्रवेश दिला जाणार नाही. तसेच प्रवेशद्वारापासूनच मतमोजणी प्रतिनिधी आणि मतमोजणीसाठी नियुक्त अधिकारी, कर्मचारी यांच्यासाठी स्वतंत्र प्रवेशाची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच जागोजागी दिशादर्शक फलक लावून मतमोजणी कक्षातील प्रवेशाबाबत माहिती देण्यात आली आहे. (हेही वाचा: Maharashtra Election Results 2024: मतमोजणीच्या दिवशी मुंबई पोलिसांनी जारी केले निर्बंध; केंद्राच्या 300 मीटर परिघात लोकांच्या एकत्र येण्यावर बंदी)

जिल्ह्यातील विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीची मतमोजणी संपूर्ण प्रक्रिया शांततेत, निर्भय व न्याय वातावरणात पार पाडण्याच्या दृष्टीने  मनाई आदेश लागू करण्यात आले आहेत. निवडणुकीच्या संदर्भात गुंतलेला अधिकारी किंवा अशा मतमोजणी केंद्रावर किंवा त्यांच्या परिसरात कर्तव्यात गुंतलेल्या कोणत्याही लोकसेवकाशिवाय इतर कोणत्याही व्यक्तीने मतमोजणी केंद्रापासून अथवा मतमोजणी केंद्राच्या परिसरापासून ३०० मीटर त्रिज्येच्या अंतरात, महामार्ग रस्ता, गल्लीबोळ किंवा इतर कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी फिरणे किंवा कोणत्याही लोकांच्या सभा किंवा गट तयार करण्यास व सामील होण्यास मनाई असेल, असे आदेश पोलीस प्रशासनाने निर्गमित केले आहेत.

विधानसभा मतदारसंघनिहाय मतमोजणी फेऱ्या-

धारावी विधानसभा मतदारसंघ – १९ मतमोजणी फेऱ्या,  सायन-कोळीवाडा – २०, वडाळा -१६, माहीम – १८, वरळी – १७, शिवडी – १९, भायखळा – १९, मलबार हिल – २०, मुंबादेवी – १७, कुलाबा – १९ अशा मतमोजणी फेऱ्या होणार आहेत.