महाराष्ट्र: जून मध्ये कोणत्याही परिस्थितीत शालेय वर्ष सुरु होण्यासह शक्य तिथे शाळा सुरु करण्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे शिक्षण विभागाला निर्देशन
परंतु लॉकडाऊनमुळे शैक्षणिक वर्षासह बोर्डाच्या परीक्षांचे वेळापत्रक बिघडल्याचे दिसून आले.
देशभरासह महाराष्ट्रात कोरोना व्हायरसने थैमान घातल्याने लॉकडाऊन आणखी काही दिवस आता कायम राहणार आहे. परंतु लॉकडाऊनमुळे शैक्षणिक वर्षासह बोर्डाच्या परीक्षांचे वेळापत्रक बिघडल्याचे दिसून आले. याच दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शनिवारी राज्यातील सर्व विद्यापीठाच्या कुलगुरुंसोबत व्हिडिओच्या माध्यमातून चर्चा केली. तसेच येत्या 2 दिवसात विद्यापीठाच्या परीक्षेबाबत निर्णय स्पष्ट होईल असे राज्याचे उच्चशिक्षण आणि तंत्रमंत्री उदय सामंत यांनी म्हटले आहे. परंतु जून महिन्यात कोणत्याही परिस्थितीत शालेय वर्ष सुरु झालेच पाहिजे असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.(विद्यापीठ, महाविद्यालाच्या अंतिम वर्षाच्या परीक्षेबाबत सर्व पर्यायांची पडताळणी करून विद्यार्थी, पालकांची चिंता संपविण्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निर्देशन)
उद्धव ठाकरे यांनी शैक्षणिक वर्षाबाबत सांगताना असे म्हटले आहे की, विद्यार्थ्यांच्या आरोग्याची काळजी घेऊन जिथे शाळा सुरु करणे शक्य आहे तेथे त्या सुरु करण्यात याव्यात. तसेच ज्या ठिकाणी ऑनलाईन पद्धतीने का होईना पण शिक्षण सुरु झाले पाहिजे असे निर्देशन सुद्धा शिक्षण विभागाला देण्यात आले आहे. तर कोरोना व्हायरस सारख्या परिस्थितीत शिक्षणाला अडथळा येत नाही हे महाराष्ट्राने देशाला दाखवून द्यावे असे ही उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले आहे. गुगल प्लॅटफॉर्मचा प्रायोगिक स्तरावर वापर करावा. मात्र,स्वतंत्रपणे संगणकीय पद्धती विकसित करून ऑनलाईन शिक्षणाची मजबूत यंत्रणा दीर्घ काळासाठी विकसित करावी असे ही सांगण्यात आले आहे.(Maharashtra Govt Guidelines #Unlock1: महाराष्ट्रात येत्या 30 जून पर्यंत लॉकडाऊन कायम राहणार, पहा कोणत्या गोष्टींसाठी सरकारने दिली परवानगी)
तर दुसऱ्या बाजूला राज्यातील वैद्यकीय महाविद्यालयांमधून फेब्रुवारी 2019 मध्ये एमबीबीएस परीक्षा उत्तीर्ण होवून इंटर्नशीप पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना सद्यस्थितीत तात्पुरते पदवी प्रमाणपत्र देण्याबाबत वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांचे महाराष्ट्र विज्ञान विद्यापीठाच्या कुलगुरूंना निर्देश देण्यात आले आहेत.