Maharashtra Budget Session 2021: गृहमंत्री अनिल देशमुख यांचे स्पष्टीकरण, जळगावमधील 'त्या' वसतीगृहात 'तो' प्रकार घडला नाही
या वेळी बोलताना ते म्हणाले हे वसतीगृह महिलांचे आहे. त्यामुळे पुरुष पोलीस अथवा अधिकारी या ठिकाणी जाऊ शकत नाहीत. त्यामुळे पोलिसांवरील आरोपात कोणत्याही प्रकारचे तथ्य नाही,
जळगाव (Jalgaon) येथील आशादीप महिला वसतिगृहातील महिला, तरुणींना कपडे काडून नृत्य करण्यास भाग पाडल्याच्या वृत्ताचे विधिमंडळात जोरदार पडसाद उमटले. या प्रकरणावरुन विरोधी पक्षाने सत्ताधाऱ्यांना धारेवर धरले. राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख ( Anil Deshmukh ) यांनी अखेर राज्य विधिमंडळात (Maharashtra Budget Session) या प्रकरणावर सविस्तर उत्तर दिले. आशादीप महिला वसतिगृहात झालेल्या कथीत प्रकाराबाबत सहा आयपीएस महिला अधिकाऱ्यांची समीती नेमूण चौकशी करण्यात आली. या चौकशीतून असे पुढे आले की असा कोणताही प्रकार या ठिकाणी घडला नाही. त्यामुळे या प्रकरणात कोणतेही तथ्य नाही.
गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सहा महिला अधिकाऱ्यांच्या चौकशी समितीचा अहवालच पटलावर ठेवला. या वेळी बोलताना ते म्हणाले हे वसतीगृह महिलांचे आहे. त्यामुळे पुरुष पोलीस अथवा अधिकारी या ठिकाणी जाऊ शकत नाहीत. त्यामुळे पोलिसांवरील आरोपात कोणत्याही प्रकारचे तथ्य नाही, असेही देशमुख यांनी या वेळी सांगितले. (हेही वाचा, जळगाव महिला वसतिगृहातील लज्जास्पद प्रकार विरोधकांनी अधिवेशनात उचलून धरला, गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दोषींवर नियमाने कारवाई करण्याचे दिले आश्वासन)
अनिल देशमुख काय म्हणाले?
- संबंधीत वसतीगृह हे महिलांचे आहे. त्यामुळे या ठिकाणी पुरुष अधिकाऱ्यांनी जायचा प्रश्नच येत नाही. पुरुष अधिकारी येथे जात नाहीत.
- वसतीगृहाच्या रजिस्टरमध्येही अशा प्रकारचा कोणता अधिकारी या ठिकाणी आल्याची नोंद नाही.
- या वसतिगृहात काही सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. यात गरबा, कविता वाचन, गाणी आदी कार्यक्रमाचा समावेश होता.
- अधिकाऱ्यांनी केलेल्या चौकशीचा अहवाल मी पटलावर ठेवत आहे. या अहवालानुसार या प्रकरणात कोणत्याही प्रकारचे तथ्य नाही.
दरम्यान, कोरोना काळात अशा प्रकारचे आयोजन करण्यातच कसे आले असा सवाल सुधीर मुनगंटीवार यांनी विचारला. यावर उत्तर देताना अनिल देशमुख यांनी सांगितले की, कार्यक्रमास केवळ 17 महिला उपस्थित होत्या. 17 महिलांच्या उपस्थितीत कार्यक्रम करण्यावर बंधन नाही.