Maharashtra Assembly Election 2019: मतदानानंतर ‘असा’ असतो ईव्हीएमचा प्रवास

निवडणूक प्रक्रिया पार पडली असली तरी काही मतदारांना ईव्हीएम मशीबद्दल अनेक प्रश्न पडले असतील. जसे की, निवडणूक झाल्यानंतर ईव्हीएम मशीनचे काय केले जाते? ईव्हीएम मशीनमधून मतमोजणी कशी केली जाते? मतदानानंतर ईव्हीएमचा प्रवास कसा असतो? या सर्व प्रश्नाची उत्तरे तुम्हाला या खास लेखातून मिळणार आहेत.

EVM (Photo Credit - PTI)

विधानसभा निवडणुकीसाठी (Maharashtra Assembly Election) सोमवारी राज्यात ईव्हीएम मशीनच्या (EVM Machine) साहाय्याने मतदानाची प्रक्रिया पार पडली. येत्या 24 ऑक्टोबरला मतदानाचा निकाल लागणार आहे. यंदा विधानसभेसाठी राज्यात 60 टक्के मतदान झाले. राज्यातील मतदारांनी उमेदवारांना दिलेली मते ईव्हीएम मशीनमध्ये कैद झाली आहेत. निवडणूक प्रक्रिया पार पडली असली तरी काही मतदारांना ईव्हीएम मशीबद्दल अनेक प्रश्न पडले असतील. जसे की, निवडणूक झाल्यानंतर ईव्हीएम मशीनचे काय केले जाते? ईव्हीएम मशीनमधून मतमोजणी कशी केली जाते? मतदानानंतर ईव्हीएमचा प्रवास कसा असतो? या सर्व प्रश्नाची उत्तरे तुम्हाला या खास लेखातून मिळणार आहेत.

मतदान प्रक्रिया पार पाडल्यानंतर ईव्हीएम केले जाते सील –

मतदानाची अधिकृत वेळ संपल्यानंतर मतदान केंद्रावरील अधिकारी मतदानाची एकूण आकडेवारी सांगतात. त्यानंतर ईव्हीएम मशीनवरील क्लोज बटन दाबून मशीन बंद करतात. ईव्हीएम बंद केल्यानंतर त्यामध्ये पुन्हा नव्याने मत नोंदवता येत नाही. निवडणूक अधिकारी ही मशीन एका बॉक्समध्ये ठेवतात. त्यानंतर या मशीनवर सील लावले जाते आणि निवडणूक आयोगाचा शिक्का मारला जातो. त्यावर मतदान केंद्रावरील अधिकारी आणि पोलिंग बुथ एजंटची सही घेतली जाते.

सर्वोच्च न्यायालयाने EVM-VVPAT संदर्भात दाखल करण्यात आलेली याचिका फेटाळली, विरोधकांना मोठा दणका

सील केलेल्या मशीन स्ट्रॉंग रुममध्ये जमा –

सर्व मतदान केंद्रावरील ईव्हीएम मशीन तालुक्याच्या ठिकाणी असणाऱ्या स्ट्रॉंगरुममध्ये जमा केल्या जातात. या स्टॉंगरुमला एकच दरवाजा असतो. या रुमच्या सर्व खिडक्या बांधकाम करून बंद केलेल्या असतात. विशेष म्हणजे या रुमला सर्व राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींच्या समोर कुलूप लावले जाते. यावेळी येथे हजर असलेल्या लोकांची नोंद केली जाते. रुम सील केल्यानंतर त्याची चावी तेथील प्रांताधिकारी किंवा दंडाधिकारी यांच्याकडे दिली जाते. ही सर्व प्रक्रिया सुरू असताना व्हिडिओ शुटिंग केले जाते.

स्ट्रॉंग रुमची सुरक्षितता - 

ईव्हीएम मशीन ठेवलेली खोली सील केल्यानंतर त्याची सुरक्षा करणं गरजेचे आहे. त्यामुळे ही मोठी जबाबदारी जिल्हाधिकारी, पोलीस अधिकारी आणि केंद्रीय निमलष्करी दलाच्या जवानांकडे दिली जाते.

मतमोजणीच्या दिवशी होणारी प्रक्रिया –

ज्या दिवशी मतमोजणी असते त्यादिवशी सर्व राजकीय पक्षाच्या उपस्थितीत व्हिडीओ शूटिंग करत स्ट्रॉंगरुमचे दरवाजे उघडले जातात. त्यानंतर या मशीन निमलष्करी दलाच्या जवानांच्या मदतीने मतमोजणीच्या ठिकाणी आणल्या जातात. मतमोजणीच्या केवळ 30 मिनिटे अगोदर या ईव्हीएम मशीनचे सील उघडले जाते. त्यानंतर फक्त मतमोजणी अधिकाऱ्यांनाच त्याठिकाणी प्रवेश दिला जातो.

मतमोजणी करताना लॅपटॉप, मोबाईल, कॅमेरा अशा इलेक्ट्रॉनिक उपकरणांना बंदी घालण्यात येते. तसेच याठिकाणचे वायफायही बंद केले जाते. मतमोजणीसाठी प्रत्येक टेबलवर एका अधिकाऱ्याची नेमणूक केली जाते. मतमोजणी करताना अनेक फेऱ्या केला जातात. त्यानंतर अंतिम निकाल जाहीर केला जातो. अशा पद्धतीने मतदानाची प्रक्रिया पार पडल्यानंतर ईव्हीएम मशीनचा प्रवास असतो. ही सर्व प्रक्रिया अत्यंत काळजीपूर्वक पार पाडली जाते.