Love Aurangabad Vs Super Sambhajinagar: लव्ह औरंगाबाद विरुद्ध सुपर संभाजीनगर, शहराच्या ब्रँडिंगरुन राजकारण तापले
दरम्यान, या डिस्प्लेंच्या निमित्ताने औरंगाबाद शहरामध्ये पालिका निवडणुकांची जोरदार चर्चा रंगली आहे.
औरंगाबाद (Aurangabad) शहरात शहराच्या ब्रँडिंगवरुन राजकारण तापले आहे. शहराच्या ब्रँडिंगसाठी शहरात ‘लव्ह औरंगाबाद’ (Love Aurangabad) चे डिस्ल्पे लाऊन तेथे सेल्फि पॉइंट तयार केले आहेत. दरम्यान, पालकमंत्री सुभाष देसाई यांनी औरंगाबाद शहराला ‘सुपर औरंगाबाद’ (Super Sambhajinagar) करण्याची घोषणा केली. औरंगाबाद शहर नवीन पाणी पुरवठा योजना भूमिपूजन कार्यक्रमात ते बोलत होते. त्याचाच धागा पकडत. महापालिकेकडून रितसर परवानगी घेऊन शिवसेना आमदार अंबादास दानवे यांच्या एका एनजीओने 'सुपर संभाजीनगर' हा बोर्ड लावला आहे. त्यामुळे शहराच्या ब्रँडिंगवरुन लव्ह औरंगाबाद विरुद्ध सुपर संभाजीनगर (Love Aurangabad Vs Super Sambhajinagar) असा सामना रंगल्याचे पाहायला मिळत आहे. दरम्यान, या डिस्प्लेंच्या निमित्ताने औरंगाबाद शहरामध्ये पालिका निवडणुकांची जोरदार चर्चा रंगली आहे.
औरंगाबाद शहराचा इतिहास, शहराचे ऐतिहासीक महत्त्व, वारसा आदी गोष्टी पुढे याव्या. या शहराचा लौकीक नव्या पीढीला माहिती व्हावा यासाठी औरंगाबाद महापालिका पालिका प्रशासनाने शहराचे ब्रँडिंग सुरु केले आहे. त्यासाठी स्मार्ट सिटीच्या माध्यातून 'लव्ह औरंगाबाद'असे डिस्प्ले लावण्यात आले आहेत. मात्र पालिकेच्या या अभिनव उपक्रमाला ‘सुपर संभाजीनगर’ चे डिस्प्ले लाऊन प्रत्युत्तर दिल्याचे पाहायला मिळत आहे. (हेही वाचा, Woman Filed Complaint Against Road In Aurangabad: महिलेला छळतो रस्ता, औरंगाबाद पोलिसात तक्रार दाखल; मानसिक, शारीरिक, आर्थिक त्रास देत असल्याचा आरोप)
औरंगाबाद शहर नवीन पाणी पुरवठा योजना भूमिपूजन कार्यक्रमात बोलताना पालकमंत्री सुभाष देसाई यांनी म्हटले होते की, औरंगाबाला 'सुपर संभाजीनगर' करण्यात येणार आहे. त्यासाठी विकासकामे जोरदार सुरु करण्यात आली आहेत. 'सुपर संभाजीनगर'च्या उभारणीसाठी सुरु करण्यात आलेली विकासकामे आता कोणीही रुखू शकरणार नाही, असेही सुभाष देसाई यांनी आपल्या भाषणात म्हटले आहेत.
पालकमंत्री सुभाष देसाई यांच्या भाषणातील धागा पकडत आता औरंगाबाद शहरात ‘सुपर संभाजीनगर’ हा डिस्प्ले झळकला आहे. शहरातील विविध ठिकाणी हे बोर्ड, डिस्प्ले पाहायला मिळत आहेत. मातृभूमी प्रतिष्ठान या संस्थेने हे बोर्ड, डिस्प्ले लावल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान, या डिस्प्लेंच्या निमित्ताने औरंगाबाद शहरामध्ये पालिका निवडणुकांची जोरदार चर्चा रंगली आहे.