Loudspeaker Row In Maharashtra: मनसेच्या 'भोंगे आंदोलना'चा हिंदू मंदिरांनाही फटका, पंढरपूर, शिर्डीसह अनेक ठिकाणी निर्बंध, भाविक ना'राज'
मात्र, या भुमिकेमुळे आता इतर धार्मिक स्थळांवरील भोंगेही उतरवावे लागणार असे दिसते. याबाबत कारवाई केल्यास हिंदू मंदिरांवरील भोंगे मोट्या प्रमाणावर उतरवले जाण्याची शक्यता आहे.
महाराष्ट्र नवनिर्माण सेना (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचा दाखला देत मशिदींवरील भोंगे हटविण्याबद्दल भूमिका घेतली खरी. मात्र, या भुमिकेमुळे आता इतर धार्मिक स्थळांवरील भोंगेही उतरवावे लागणार असे दिसते. याबाबत कारवाई केल्यास हिंदू मंदिरांवरील भोंगे मोट्या प्रमाणावर उतरवले जाण्याची शक्यता आहे. शिर्डी येथील साईबाबा मंदिरात भोंगे लावल्यापासून पहिल्यांदाच काकड आरती विना भोंगा पार पडली. शेजारतीचीही हीच स्थिती होती. आता पंढरपूर देवस्थान मंदिरावरील भोंगेही उतरविण्यात येणार असल्याचे समजते. अर्थात सकाळी 6 ते रात्री दहा वाजेपर्यंत हे भोंगे वाजवता येऊ शकतात. मात्र, हिंदू मंदिरांमध्येही काकड आरत्या आणि शेजारत्या भल्या पहाटे आणि रात्री उशीरा पार पडतात. त्यामुळे हिंदू मंदिरांचीच अधिक पंचायत होण्याची शक्यता आहे.
पंढरपूर येथील विठ्ठल मंदिरात होणारी काकड आरती, दुपारती आणि नामस्मरण आदी वेळी भोंगे वापरण्यात येतात. परंतू, नियमांचे पालन करायचे तर हे भोंगे रात्री दहा ते सकाळी सहा या काळात बंद ठेवावे लागणारआहेत. तसेच दिवसभरात होणाऱ्या इतर आरतीवेळीही डेसीबलचे पालन करावे लागणार आहे. दरम्यान, विठ्ठल मंदिरावरील भोंगे बंद करावे किंवा नाही याबाबत अद्याप निश्चिती न झाल्याने विठ्ठल मंदिरातील आज पहाटेची काकड आरती भोंग्यावरच झाली आहे. दरम्यान, प्रशासन या सर्वांकडे कसे पाहते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. (हेही वाचा, Loudspeaker Row In Maharashtra: मनसे नेते संदीप देशपांडेंवर गुन्हा दाखल, शोध सुरु)
दरम्यान, औरंगाबाद येथील सभा आणि काल (4 मे) घेतलेली पत्रकार परिषद यात राज ठाकरे यांनी जाहीरपणे मशिद आणि मंदिरांवरील अनधिकृत भोंगे उतरवायलाच हवेत असेही म्हटले होते. तसेच, सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाचेही पालन केले जावे, असे राज ठाकरे यांनी म्हटले होते. या वेळी त्यांनी भोंग्यांच्या डेसीबलबाबतही पुनरुच्चार केला होता.
दरम्यान, मुंबई पोलीस आयुक्त संजय पांडे यांनी नुकतीच मुंबईतील मंदिर, चर्च, गुरुव्दारा तसेच सर्व धर्मीयांच्या प्रार्थनास्थळांच्या ट्रस्टींची बैठक घेतली. या बैठकांमध्ये धार्मिक स्थळांवर लाऊडस्पीकर लावल्यास नियमांचे काटेकोरपणे पालन व्हावे. हे पालन झाले नाहीतर कडक कारावाई केली जाईल, असा स्पष्ट इशारा आयुक्तांनी दिला आहे. लाऊडस्पीकर न लावता जरी 55 डेसीबलपेक्षा अधिक आवाज केला तरीही कारवाई केली जाईल, असेही पोलीस आयुक्तांनी या वेळी स्पष्ट केले आहे.
काँग्रेस नेते सचिन सावंत यांनीही मनसेच्या भोंग्यांबद्दलच्या भूमिकेवरुन टीका केली आहे. मनसेचे अज्ञान किती? असा सवाल ट्विटरच्या माध्यमातून विचारत सावंत यांनी म्हटले आहे की, मुंबई पोलीस अॅक्ट 38 (1) अन्वये मुंबईत पोलीस लाऊडस्पीकर लावण्यास परवानगी देतात. यात किती व केवढा वेळ वापरण्याचा नियम नाही. सर्वोच्च न्यायालयाने रात्री 10 ते सकाळी 6 पर्यंत मर्यादा घालून डेसिबलवर नियंत्रण ठेवले. याव्यतिरिक्त कोणतेही बंधन नाही.