मुंबईत 8000 कोटी रुपयांचे प्रकल्प विकसित करणार L&T Realty; निवासी संकुलासह उभे राहणार आधुनिक 'शॉपिंग' कॉम्प्लेक्स, जाणून घ्या ठिकाणे

पुढील पाच वर्षांत 5 दशलक्ष चौरस फूट क्षेत्र जोडण्याची कंपनीची योजना आहे.

Building | Image of a construction site used for representational purpose | Image: Flickr

लार्सन अँड टुब्रोची रिअल इस्टेट डेव्हलपमेंट शाखा एल अँड टी रिअॅल्टी (L&T Realty) मुंबई (Mumbai) प्रदेशात संयुक्तपणे 8,000 कोटी रुपयांचे प्रकल्प विकसित करणार आहे. यासाठी कंपनीने करार केला आहे. ‘कंपनीने दक्षिण मुंबई, पश्चिम उपनगरी भाग अंधेरी आणि ठाणे येथे 8,000 कोटी रुपयांच्या प्रकल्पांच्या संयुक्त विकासासाठी निश्चित करार केला आहे, असे एल अँड टी रिअॅल्टीने सोमवारी एका निवेदनात म्हटले आहे. मात्र, ज्या कंपन्यांसोबत करार करण्यात आले आहेत त्यांची नावे दिलेली नाहीत.

एल अँड टी रिअॅल्टीने सांगितले की, महानगरांमध्ये आपली उपस्थिती मजबूत करण्याच्या कंपनीच्या योजनेचा हा एक भाग आहे. पुढील पाच वर्षांत 5 दशलक्ष चौरस फूट क्षेत्र जोडण्याची कंपनीची योजना आहे. कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीकांत जोशी म्हणाले, ‘आम्ही आमची पोहोच वाढवण्यासाठी कटिबद्ध आहोत आणि यासाठी सतत नवीन बाजारपेठाकडे पाहत आहोत.’

निवेदनानुसार कंपनी दक्षिण मुंबईतील पाच एकर जागेवर निवासी प्रकल्प विकसित करणार आहे. दुसरा प्रकल्प पश्चिम उपनगरातील अंधेरी येथे आहे, ज्या ठिकाणी कंपनी निवासी संकुल आणि आधुनिक 'शॉपिंग' संकुल उभारणार आहे. ठाण्यातील प्रकल्पात कंपनी सहा एकर जागेवर निवासी प्रकल्प विकसित करणार आहे. (हेही वाचा: खेड - भीमाशंकर या राज्यमार्ग रस्त्यास राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा : नितीन गडकरी)

दरम्यान, मुंबई-पुणे मार्गावरील केंद्र सरकारचा अतिमहत्त्वकांक्षी हायपर लूप प्रकल्प गुंडाळण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे. या मार्गावर आता मुंबई-पुणे-हैदराबाद रेल्वे प्रकल्प तयार करण्यात येणार आहे. दुसरीकडे मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाला आणखी गती मिळणार आहे. एकनाथ शिंदे यांनी मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनला सर्व प्रकारची मंजुरी दिली. मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही माहिती दिली. बुलेट ट्रेन पुढील वर्षी म्हणजे 2023 मध्ये धावणार होती, परंतु महाराष्ट्रात भूसंपादनाच्या संथ गतीमुळे त्याला विलंब होत आहे.