Koregaon Bhima: शौर्य दिनाच्या पार्श्वभूमीवर कोरेगाव भीमा येथे 31 डिसेंबर आणि 1 जानेवारी रोजी मद्यविक्रीस बंदी

दलित समाज हा विजय शोषित समाजाच्या स्वाभिमानाची सुरुवात म्हणून साजरा करतात.

Koregaon Bhima (Photo Credits-Twitter)

भीमा नदीच्या काठी असलेल्या कोरेगाव (Koregaon Bhima) येथे 1 जानेवारी 1818 मध्ये एक ऐतिहासिक लढाई झाली. ही लढाई इंग्रज आणि पेशव्यांमध्ये झाली होती. महार समाजातील सैन्याच्या जोरावर इंग्रजांनी पेशवाईविरुद्ध युद्ध पुकारले होते. हे युद्ध इंग्रजांनी जिंकल्यानंतर त्यांनी लढाईच्या स्मरणार्थ कोरेगाव भीमा येथे जयस्तंभ बांधला. दरवर्षी कोरेगाव भीमा येथे 1 जानेवारी रोजी विजयस्तंभ शौर्य दिन मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. महार सैनिकांच्या सन्मानार्थ येथील विजयस्तंभाला मानवंदना देण्यासाठी दरवर्षी 1 जानेवारी रोजी महाराष्ट्रासह देशभरातून बौद्ध (विशेषतः पूर्वाश्रमीचे महार), अन्य दलित, शीख व इतर जातीचे लोकही लाखोंच्या संख्येने इथे येत असतात.

आता यंदाच्या शौर्य दिनाच्या पार्श्वभूमीवर भीमा कोरेगाव परिसरात म्हणजेच शिक्रापूर आणि लोणीकंद पोलीस स्टेशनच्या हद्दीत 31 डिसेंबर आणि 1 जानेवारी या कालावधीत मद्य विक्रीवर बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या काळात परिसरातील सर्व मद्य दुकाने पूणर्तः बंद राहणार आहेत. या बंदीच्या नियमाचे उल्लंघन केल्यास कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांनी दिले आहेत. काही दिवसांपूर्वी जिल्हाधिकारी डॉ. देशमुख यांनी विजयस्तंभ परिसरात नियोजनाशी संबंधित अधिकाऱ्यांची बैठक घेतली होती.

शौर्य दिनाचे औचित्य साधत दरवर्षी लाखोंच्या संख्येने अनुयायी भीमा कोरेगाव परिसरात एकत्र येत असतात. अशावेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांनी मद्य विक्री बंदीचा निर्णय घेतला आहे. दुसरीकडे कोविडनंतर हा दिवस साजरा होत असल्याने, या दिवशी भीमा कोरेगावला भेट देणाऱ्या नागरिकांच्या सोयी-सुविधेसाठी विशेष व्यवस्था करण्यात आल्या आहेत. यामध्ये ज्यादा बसेस, तात्पुरती स्वच्छतागृहे, रुग्णवाहिका, आरोग्य पथके, पिण्याच्या पाण्याचे टँकर्स, अग्निशमन वाहने यांचा समावेश आहे. (हेही वाचा: कर्नाटकसोबतच्या सीमावादानंतर आता महाराष्ट्रातील 55 गावांची गुजरातमध्ये विलीन होण्याची इच्छा; प्रशासनाकडे केली विनंती)

दरम्यान, दरवर्षी 1 जानेवारी रोजी, दलित समुदाय 1818 च्या लढाईचा वर्धापन दिन साजरा करतात, ज्यामध्ये ईस्ट इंडिया कंपनीच्या सैन्याने दलित सैनिकांसह पुण्याच्या पेशव्यांच्या सैन्याचा पराभव केला. दलित समाज हा विजय शोषित समाजाच्या स्वाभिमानाची सुरुवात म्हणून साजरा करतात. पेशवाईच्या काळात अस्पृश्यतेचे पालन मोठ्या प्रमाणावर होत होते व महार, मांग व इतर अस्पृश्यांना अत्यंत हीन वागणूक दिली जात असे, याला विरोध म्हणून महार सैनिक आत्मसन्मासाठी ब्रिटिशांच्या बाजूने पेशवे व मराठ्यांविरूद्ध लढले आणि विजयी झाले.