इंदिरा गांधी यांच्या असामान्य कर्तृत्त्वाबद्दल प्रचंड आदर, बीडमधील माझ्या भाषणाचे अर्थ-अनर्थ काढण्यात आले; जितेंद्र आव्हाड यांचे स्पष्टीकरण
मात्र, माझ्या बीडमधील भाषणाचे अर्थ-अनर्थ काढले जात आहेत, असं स्पष्टीकरण राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी दिलं आहे.
भारताच्या माजी पंतप्रधान आणि काँग्रेसच्या दिवगंत नेत्या इंदिरा गांधी (Former Prime Minister Indira Gandhi) यांच्या असामान्य कर्तृत्त्वाबद्दल मला प्रचंड आदर आहे. मात्र, माझ्या बीडमधील भाषणाचे अर्थ-अनर्थ काढले जात आहेत, असं स्पष्टीकरण राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड (Home Minister Jitendra Awhad) यांनी दिलं आहे. माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी आणीबाणी लागू करुन लोकशाहीचा गळा घोटण्याचा प्रयत्न केला होता, असं वादग्रस्त विधान जितेंद्र आव्हाड यांनी बुधवारी बीड (Beed) येथील संविधान महासभेत केलं होतं. या वक्तव्यावर काँग्रेसकडून तीव्र प्रतिक्रिया उमटू लागल्यानंतर जितेंद्र आव्हाड यांनी आपल्या अधिकृत ट्विटरवर हँडलवरून व्हिडीओ शेअर करत यासंदर्भात स्पष्टीकरण दिलं आहे.
जितेंद्र आव्हाड यांनी या व्हिडिओमध्ये सांगितलं की, बीडमधील माझ्या भाषणाचे अर्थ अनर्थ काढले जात आहेत. मी इंदिरा गांधींना अतिशय आदर्श मानणारा राजकीय कार्यकर्ता आहे. काँग्रेस पक्ष ही एक लोकचळवळ आहे, जी महात्मा गांधी यांनी सुरू केली होती. संयुक्त महाराष्ट्रासह मुंबई झालीच पाहिजे हा निर्णय जेव्हा आला, तेव्हा यामागील प्रमुख भूमिका इंदिरा गांधींची होती. पंतप्रधान झाल्यानंतर बँकांचं राष्ट्रीयकरण, राजा-महाराजांचे तनखे बंद करणे, 1971 साली पाकिस्तान धडा शिकवणं, सिक्कीम खेचून भारतात समाविष्ट करणं, पोखरणला अणुचाचणी घेणं, आदी महत्त्वाची काम इंदिरा गांधी यांनी केली. परंतु, 1975 ते 1977 च्या काळामध्ये त्यांच्या काही भूमिकांमुळे काही लोकांना लोकशाहीच्या मूलभूत अधिकारांवर गदा येतं आहे, असं वाटलं. त्यामुळे काहीजणांनी इंदिरा गांधी यांच्या या भूमिकेला पाठिंबा दिला तर काहींनी विरोध दर्शवला. या सर्व प्रकारामुळे 1974 मध्ये विद्यार्थ्यांनी आंदोलनाला सुरुवात केली. (हेही वाचा - 'माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी आणीबाणी लागू करुन लोकशाहीचा गळा घोटण्याचा प्रयत्न केला होता' जितेंद्र आव्हाड यांच्या वक्तव्याने नव्या वादाला आमंत्रण)
1977 च्या लोकसभा निवडणुकीत इंदिरा गांधी यांचा पराभव झाला. हा इतिहास आहे. जेव्हा देशातील नागरिकांच्या मूलभूत अधिकारांवर गदा आणली जाते तेव्हा जनता पेटून उठते. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासंदर्भात तेच घडत आहे. इंदिरा गांधी यांचे कर्तृत्व मोठं आहे. परंतु, या देशात त्यांचा पराभव होऊ शकतो, तर मोदी आणि अमित शाह कोण आहेत? माझे मित्र किरीट सोमय्या यांनीही लक्षात ठेवावं, मी इंदिरा गांधींचा समर्थक आहे. हे सांगायला मला लाज नाही वाटत नाही. इंदिरा गांधींची तुलना मोदी-शाहांशी होऊ शकत नाही, अशी टीकाही आव्हाड यांनी यावेळी केली.