जेजुरी खंडोबाच्या दर्शन वेळेत बदल; जाणून घ्या नवी वेळ
त्याचबरोबर मंदिरांमध्ये होणारी गर्दी लक्षात घेता दर्शन वेळांमध्ये बदल करण्यात आले आहे. जेजुरीच्या खंडोबा मंदिरामध्ये देखील दर्शन वेळेत बदल करण्यात आला आहे.
राज्यातील कोरोना रुग्णवाढीच्या पार्श्वभूमीवर अनेक ठिकाणी कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. त्याचबरोबर मंदिरांमध्ये होणारी गर्दी लक्षात घेता दर्शन वेळांमध्ये बदल करण्यात आले आहे. जेजुरीच्या खंडोबा (Jejuri Khandoba) मंदिरामध्ये देखील दर्शन वेळेत बदल करण्यात आला आहे. आता नव्या नियमांनुसार, सकाळी 7 ते रात्री 8 वाजेपर्यंत मंदिर दर्शनासाठी खुलं राहणार आहे. यापूर्वी दर्शनाची वेळ पहाटे 5 ते रात्री 9 अशी होती. मात्र कोविड-19 रुग्णांच्या वाढत्या संख्येनंतर कालपासून राज्यात रात्री 8 ते सकाळी 7 पर्यंत जमावबंदी लागू करण्यात आली आहे. त्यामुळे दर्शनवेळेतही बदल करण्याचा निर्णय देवस्थानकडून घेण्यात आला आहे. (कोरोनाचे संकट! येत्या संकष्टी चतुर्थीला पुण्यातील गणेश मंदिरे राहणार बंद)
जमावबंदीच्या निर्णयानंतर शिर्डीतील साईबाबा मंदिराच्या दर्शनवेळेतही बदल करण्यात आला आहे. त्यानंतर आता जेजुरी खंडोबाची दर्शन वेळही बदलली आहे. (शिर्डी साईबाबा मंदिरातील 'साईप्रसाद' पुन्हा सुरु; भक्तांना मिळणार मोफत लाडू)
गेल्या वर्षी कोरोना व्हायरस संकटामुळे लॉकडाऊन कालावधीत राज्यातील मंदिरं बंद करण्यात आली होती. त्यानंतर तब्बल 8 महिन्यांनी मंदिरं भाविकांसाठी खुली करण्यात आली होती. मात्र कोविड19 चे संकट टळले नसल्यामुळे यात्रा-उत्सव कालावधीत मंदिर भाविकांसाठी बंद ठेवण्यात आले होते. तसंच इतर वेळेस कोरोना नियमांचे पालन करुनच दर्शन खुले करण्यात आले होते.
दरम्यान, आज राज्यात 31,643 नवे रुग्ण आढळून आले असून 102 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 20.854 रुग्णांनी कोरोनावर मात केली असून 3,36,584 सक्रीय रुग्ण आहेत. रुग्णसंख्या सातत्याने वाढत असल्याने सरकारने लॉकडाऊनचे नियोजन करण्याचे निर्देश दिले आहेत. परंतु, लॉकडाऊनला भाजपसह राष्ट्रवादी काँग्रेसकडूनही विरोध होत आहे.