Dhananjay Munde Allegation Case: धनंजय मुंडे यांच्यावरील आरोप प्रकरणी जंयत पाटील, देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील यांनी दिल्या प्रतिक्रिया
विरोधकांनी आक्रमक भूमिका घेत त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली. तर, सत्ताधारी मंत्र्यांनी सावध भूमिका व्यक्त करत मुंडे यांना अप्रत्यक्ष पाठिंबा दर्शवला
राज्यातील सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्यावर एका महिलेने बलात्काराचा आरोप केला आणि राज्याचे राजकारण ढवळून निघाले. विरोधकांनी आक्रमक भूमिका घेत त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली. तर, सत्ताधारी मंत्र्यांनी सावध भूमिका व्यक्त करत मुंडे यांना अप्रत्यक्ष पाठिंबा दर्शवला. या प्रकरणात राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil ), राज्यमंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar), विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis), भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Pati) यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत.
ही न्यायालयीन आणि कुटुंबातील अंतर्गत बाब- जयंत पाटील
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे अहमदनगर येथे एका कार्यक्रमसाठी उपस्थित होते. या वेळी प्रसारमाध्यमांनी जयंत पाटील यांना धनंजय मुंडे यांच्याबाबत प्रश्न विचारला. या वेळी बोलताना जयंत पाटील म्हणाले, 'धनंजय मुंडे यांनी आपली भूमिका आणि मतं स्पष्टपणे व्यक्त केले आहे. हे प्रकरण न्यायप्रविष्ठ आहे. तसेच ही बाब त्यांच्या कुटुंबांतर्गत आहे. त्यामुळे कोणी काही आरोप केले की लगेच एखाद्या निष्कर्षापर्यंत येणे योग्य नाही. माणसाला राजकारणात आयुष्य उभं करायला खूप काळजातो. राजकीय स्तरावर यायला प्रचंड कष्ट घ्यावे लागतात. त्यामुळे चौकशी न करता सत्यता जाणून न घेता कोणत्याही निष्कर्षापर्यंत येणे योग्य नाही.' (हेही वाचा, Dhananjay Munde Allegation Case Updates: धनंजय मुंडे यांनी अजित पवार, छगन भुजबळ यांच्यानंतर शरद पवार यांचीही भेट घेतल्याची चर्चा)
नैतिक जबाबदारी स्वीकारुन राजीनामाद्यावा- चंद्रकांत पाटील
भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी ट्विटरद्वारे आणि पत्रकार परिषद घेऊन प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी आपल्या प्रतिक्रियेत म्हटले आहे की, “सामाजिक न्यायमंत्री असलेल्या धनंजय मुंडे यानी आपल्या चुकीच्या कृत्यांबद्दल तात्काळ राजीनामा द्यायला हवा. मुंडे यांच्यावर लैंगिक शोषणाचे आरोप पाहता त्यांना मंत्रीपदावर राहण्याचा कोणताही हक्क नाही. भारतीय जनता पार्टीच्या महिला शाखेच्या वतीने एक पत्रक प्रसिद्ध करण्यात आले असून, त्यामध्ये मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. आम्हीही आता याविषयी आणखी जोरदार मागणी करणार आहोत. ज्या व्यक्तीवर अशा प्रकारचे आरोप होतात, त्याला या पदावर राहण्याचा कोणताही अधिकार नसतो. मात्र, गेंड्याच्या कातडीचे हे मंत्री आणि महाविकास आघाडीचे सरकार याबाबत आत्मपरीक्षण करून मुंडेंचा राजीनामा घेतील, असं वाटतं नाही. तरीही मुंडे यांनी या पदाचा राजीनामा द्यावा, अशी आमची मागणी आहे,”
मुंडे यांच्या पक्षाने तातडीने राजीनामा घ्यावा- देवेंद्र फडणवीस
धनंजय मुंडे यांनी स्वत:च कबुली दिली आहे. त्यामुळे त्यांच्या पक्षाने त्यांचा राजीनामा तातडीने घ्यावा. शेवटी नैतिकता महत्त्वाची. त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा देऊन चौकशीला सामोरे जावे. चौकशीतून काय बाहेर येते ते पाहावे, असे विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. ते नाशिक येथे बोलत होते.
प्यार किया तो डरना क्या?- अब्दुल सत्तार
धनंजय मुंडे यांच्या मदतीला शिवसेना आली आहे. शिवसेनेचे राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी धनंजय मुंडे यांची पाठराखण करत म्हटले आहे की, धनंजय मुंडे यांनी हे प्रकरण दडवले नाही. त्यांनी वास्तव सांगितले आहे. त्यांनी ही बाब लपवली असती तर वेगळी गोष्ट आहे. पण त्यांनी सर्व सांगून टाकले आहे. त्यांनी या गोष्टी नाकारल्याही नाहीत. त्यामुळे प्यार किया तो डरना क्या? असे म्हणत शिवसेनेचे राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी मुंडे यांना पाठिंबा दर्शवला आहे.
धनंजय मुंडे यांच्यावर एका महिलेने त्यांच्यावर बलात्काराचा आरोप केला आहे. या प्रकरणानंतर धनंजय मुंडे यांनीही आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन एक पोस्ट लिहीत सविस्तर खुलासा केला. या आरोप प्रकरणानंतर धनंजय मुंडे यांनी एका बैठकीदरम्यान, राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांची तसेच, अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांची भेट घेतली. धनंजय मुंडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांचीही भेट घेतल्याचे वृत्त आहे.