Jalna: जालना मधील शाळा, महाविद्यालये, कोचिंग क्लासेस, साप्ताहिक बाजारपेठा 31 मार्च पर्यंत बंद
त्यातच आता जालना जिल्ह्यातही महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आल्याची माहिती समोर येत आहे.
राज्यातील कोविड-19 (Covid-19) च्या वाढत्या संसर्गामुळे अनेक जिल्ह्यात कडक नियम लागू करण्यात आले आहेत. त्यातच आता जालना (Jalna) जिल्ह्यातही महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. जिल्ह्यातील शाळा (Schools), महाविद्यालये (Colleges), कोचिंग क्लासेस (Coaching Classes) आणि साप्ताहिक बाजारपेठा (Weekly Markets) 31 मार्चपर्यंत बंद ठेवण्यात येणार आहेत. तसंच सर्व भाजीपाला, फळ, वृत्तपत्र विक्रेत्यांची रॅपिड अँटीजेन चाचणी (Rapid Antigen Test) वेळोवेळी करण्यात येणार असल्याचे जालना जिल्हाधिकारी एसपी व्ही. देशमुख (SP V.Deshmukh) यांनी सांगितले आहे.
यापूर्वी पुणे, नाशिक, औरंगाबाद, सातारा या जिल्ह्यांमध्ये नाईट कर्फ्यू लागू करण्यात आला असून अमरावती मध्ये लॉकडाऊन सुरु आहे. तर नागपूर जिल्ह्यात शाळा, कॉलेज, कोचिंग क्लास 7 मार्च बंद ठेवण्यात आले आहेत. गेल्या काही दिवसांपासून राज्यातील कोरोना बाधितांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. त्यामुळेच धोका टाळण्यासाठी वेळीच कठोर नियमांची अंमलबजावणी करण्यात आली आहे. (औरंगाबाद शहरातील सर्व शाळा आणि कोचिंग क्लासेस बंद; महापालिका आयुक्त अस्तिककुमार पांडे यांचे आदेश)
ANI Tweet:
दरम्यान, काल राज्यात 6,218 नव्या कोरोनाग्रस्त रुग्णांची नोंद झाली असून 51 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर 5,869 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. या नव्या वाढीमुळे एकूण रुग्णसंख्या 21,12,312 इतकी झाली असून 51,857 मृतांची नोंद झाली आहे. तर सध्या 53,409 अॅक्टीव्ह रुग्ण असून आतापर्यंत एकूण 20,05,851 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.
आठ दिवसांत परिस्थितीची पाहणी करुन लॉकडाऊनचा निर्णय घेण्यात येईल, असा इशारा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिला आहे. तसंच नियमांचे पालन करण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे. विशेष म्हणजे नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारण्यात येणार आहे.