एकनाथ खडसे BJP ला रामराम ठोकणार? शिवसेना आमदार गुलाबराव पाटील यांच्या 'या' गौप्यस्फोटानंतर चर्चेला उधाण
मीडिया रिपोर्ट्सनुसार, जळगावमध्ये माध्यमांशी बोलताना गुलाबराव पाटील यांनी हा दावा केला आहे
भाजपा नेते गिरीश महाजन आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामुळे महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 मधील तिकीट कापलं गेल्याचं मोठा गौप्यस्फोट नववर्षाच्या पहिल्या दिवशीच एकनाथ खडसे यांनी करून पुन्हा आपली नाराजी सगळ्यांसमोर व्यक्त केली आहे. दरम्यान एकनाथ खडसे यांच्या नाराजीनाट्यानंतर आता शिवसेना आमदार गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांनी खडसे शिवसेनेच्या संपर्कामध्ये असल्याचा दावा केला आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, जळगावमध्ये माध्यमांशी बोलताना गुलाबराव पाटील यांनी हा दावा केला आहे. हे देखील वाचा- '...तर पाडापाडीचे राजकारण करणाऱ्या भाजप नेत्यांची नावे जाहीर करेल' एकनाथ खडसे यांच्याकडून गिरीश महाजन यांना इशारा.
जळगाव जिल्हा परिषद एकनाथ खडसे यांच्याकडे आहे. राज्याप्रमाणेच जिल्ह्या परिषदेतील सत्तेपासूनही भाजपाला दूर ठेवण्यासाठी शिवसेना आणि एकनाथ खडसे यांच्यामध्ये हातमिळवणी होऊ शकते असे अंदाज लावण्यात येत आहेत. विधानसभेत आमदारकीचं तिकीट कापल्यापासून एकनाथ खडसे यांनी महाराष्ट्र पक्ष नेतृत्त्वावर टीका केली होती. अनेकदा मनातील खदखद स्पष्टपणे बोलून दाखवली आहे. त्यानंतर शरद पवार यांच्यासोबतही त्यांनी भेट घेतली होती.
सध्या बंडाच्या पवित्र्यात असलेल्या एकनाथ खडसे यांनी काही दिवसांपूर्वी गोपिनाथ मुंडे यांच्या जयंती दिवशी भगवानगडावरून पक्षावर टीका करताना येत्या काही दिवसात भाजपाला रामराम ठोकण्याचा मानस बोलून दाखवला होता. आता एकनाथ खडसे यांची नाराजी दूर करणार की त्यांना पक्षाला रामराम ठोकावा लागणार हे पहाणं महत्त्वाचं आहे.