Jalgaon Accident: ट्रकच्या धडकेत आई-वडीलांचा करुन अंत, तीन वर्षांचे बाळ मात्र सुखरुप

नशिराबाद येथे महाजन हॉटेलजवळ महामार्गावर त्यांच्या दुचाकीला अज्ञात आयशर वाहनाने धडक दिल्याने ते जागीच कोसळले.

Accident (PC- File Photo)

जळगावात घराकडे परतणाऱ्या दाम्पत्यावर क्रुर काळाने झडप घातली. (Jalgaon News) अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीवरील पती- पत्नी ठार झाल्याची (Accident News) घटना नशिराबादजवळ महामार्गावर घडली. या अपघातात तीन वर्षीय बाळ मात्र सुखरुप बचावले आहे. सामरोद (ता. जामनेर) येथील शेनफडू बाबुराव कोळी (वय 35) व त्यांची पत्नी भारती कोळी (वय 32) असे मयत दांपत्याचे नाव आहे. तर चिमुरडा रुद्र (वय 3) सुखरुप बचावला आहे.  (हेही वाचा - Pune Accident: जुन्या मुंबई-पुणे महामार्गावर गॅस टँकरचा अपघात; वाहतुक विस्कळीत)

कोळी दाम्पत्य मुलगा रुद्र याच्यासह सामरोद येथे वास्तव्यास आहे. शेती काम करून ते कुटूंबाचा उदरनिर्वाह करत होते. शेनफडू कोळी यांच्या असोदा येथील शालकाला मुलगा झाल्याने त्याला पाहण्यासाठी ते पत्नी व मुलासह शुक्रवारी आसोदा येथे आले होते. रात्रभर मुक्काम करून सकाळी ते दुचाकीने नशिराबाद मार्गे सामरोदला परत जात होते.

नशिराबाद येथे महाजन हॉटेलजवळ महामार्गावर त्यांच्या दुचाकीला अज्ञात आयशर वाहनाने धडक दिल्याने ते जागीच कोसळले. या अपघातात भारती कोळी यांचा जागीच मृत्यू झाला. तर, शेनफडू कोळी व त्यांचा मुलगा रुद्र याला नशिराबाद पोलीस व नागरिकांनी जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी आणले. तेथे उपचार सुरू असताना शेनफडू यांचा मृत्यू झाला. रुद्र याला किरकोळ मार लागला.