दुष्काळात दुषित पाण्याचा तेरावा महिना; नगर जिल्ह्यात 124 गावांमध्ये दूषित पाणीपुरवठा, दापोली तालुक्यात 34 जणांना रोगाची लागण
त्यातील 1 हजार 300 गावांतील पाणी हे दुषित असल्याचे आढळले होते. दापोली तालुक्यातही दुषित पाण्याने 34 जणांना डेंग्यू, अतिसार, ताप, डोकेदुखी यांची लागण झाली आहे.
राज्यातील दुष्काळाची (Drought) छाया सध्या प्रचंड गडद होत चाललेली दिसून येत आहे. एकीकडे लोक पाण्याची चोरी करत आहेत, तर दुसरीकडे आटलेली विहीर अजून खोल खणली जात आहे. मात्र सरकारकडून अजूनही ठोस उपाययोजना केली गेली नाही. उटल ज्या ठिकाणी पाणी पुरवठा होत आहे त्या ठिकाणीही सरकार दुषित पाणी पाजून जनतेच्या जीवावर उठले आहे. नुकत्याच झालेल्या परीक्षणामध्ये अहमदनगर जिल्ह्यातील 124 गावांना एप्रिल महिन्यात दुषित पाणीपुरवठा होत असल्याचे निदर्शनास आले आहे.
जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने जवळजवळ 20 हजार गावांतील पाण्याचे नमुने तपासले होते. त्यातील 1 हजार 300 गावांतील पाणी हे दुषित असल्याचे आढळले होते. आता अशा गावांतील पाण्याच्या स्त्रोताजवळ काही उपाययोजना करण्यात याव्यात अशा सूचना आरोग्य विभागाकडून देण्यात आल्या आहेत. तसेच शुद्धीकरण करूनच पाणी जनतेपर्यंत पोहचवले जावे असे सांगण्यात आले आहे. (हेही वाचा: आता मुंबईकरांना थेट नळाचं पाणी पिणं सुरक्षित; पाण्यातील Coliform Bacteria चं प्रमाण सुरक्षित स्तरावर असल्याचा BMC चा अहवाल
दुसरीकडे, दुष्काळामुळे कोकणातही पाण्याची टंचाई जाणवू लागली आहे. दापोली तालुक्यातही दुषित पाण्याने 34 जणांना डेंग्यू, अतिसार, ताप, डोकेदुखी यांची लागण झाली आहे. या सर्वांवर दापोली इथे उपचार सुरु आहेत. तालुक्यातील काही गावांमध्ये दोन आठवड्यातून एकदा पाणी पुरवठा होतो, यात दुषित पाणी पुरवठा झाल्याने रोगराई पसरली. सांगली जिल्ह्यातील मिरज येथेही ऐन रमजानच्या काळात गेल्या आठ दिवसांपासून पिण्यासाठी दुषित पाण्याचा पुरवठा होत आहे. महापालिकेकडे तक्रार करूनही याबाबत उपयोजना केली जात नाही. त्यामुळे दुष्काळात तेरावा महिना अशीच नागरिकांची परिस्थिती निर्माण झाली आहे.