दिलासादायक! राज्यात एकाच दिवशी Coronavirus चे 587 रुग्ण बरे होऊन घरी परतले; महाराष्ट्राने नोंदवला नवा विक्रम
महाराष्ट्रात मागील 24 तासात कोरोनाचे नवे 1230 रुग्ण आढळून आल्याने,
सध्या कोरोना विषाणू (Coronavirus) बाबत संपूर्ण भारतामध्ये महाराष्ट्राची (Maharashtra) स्थिती फार गंभीर आहे. महाराष्ट्रात मागील 24 तासात कोरोनाचे नवे 1230 रुग्ण आढळून आल्याने, आता राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा 23,401 वर पोहचला आहे. यामधल्या दिलासादायक बातमी म्हणजे कालच्या एका दिवसात कोरोनावर मात केलेल्या 587 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. अशाप्रकारे एकाच दिवशी कोरोना विषाणूचे 587 रुग्ण बरे होऊन घरी सोडल्याची ही विक्रमी नोंद महाराष्ट्राच्या नावावर झाली आहे. राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) याबाबत माहिती दिली.
महाराष्ट्रामध्ये मुंबई व पुणे या ठिकाणी कोरोना विषाणूचे सर्वाधिक रुग्ण आढळले आहेत. मुंबईमधील झोपडपट्टी भागातील रुग्णांची संख्या अधिक आहे. राज्यात एकीकडे रुग्णांची संख्या वाढत असताना दुसरीकडे बरे झालेल्या लोकांच्या संख्येमध्येही वाढ झाली आहे. अशा प्रकारे आरोग्य यंत्रणेच्या प्रयत्नांमुळे रुग्णांसोबतच नातेवाईकांनाही दिलासा मिळाला आहे. आजच्या ‘जागतिक परिचारिका दिना’च्या पूर्वसंध्येला एवढ्या संख्येने रुग्ण बरे झाल्याची भेट राज्याला मिळाली आहे. (हेही वाचा: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोना जाहीर केले 20 लाख कोटी रुपयांचे पॅकेज)
आरोग्यमंत्र्यांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवार, दि. 11 मे रोजी मुंबई महापालिका क्षेत्रातील 55, ठाणे क्षेत्रातील 209, रायगड क्षेत्रातील 53 असे मुंबई मंडळात एकूण 321 रुग्णांना घरी सोडले. आतापर्यंत एकूण 3160 रुग्णांना सोडण्यात आले आहे. पुणे मंडळात एकूण 1146 रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे. नाशिक मंडळात आतापर्यंत एकूण 134 रुग्णांना, कोल्हापूर मंडळात आतापर्यंत एकूण 42 रुग्णांना, औरंगाबाद मंडळात एकूण 117, लातूर मंडळात एकूण 12, अकोला मंडळात एकूण 101 तर नागपूर मंडळात आतापर्यंत एकूण 74 रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे. अशा प्रकारे आतापर्यंत राज्यात एकूण 4786 रुग्ण बरे होऊन त्यांना दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहे.