'संभाजी भिडे कोण हे मला माहितही नव्हते'; अखेर Sudha Murthy यांनी दिले स्पष्टीकरण

भिडे वयाने मोठे असल्याने त्या त्यांच्या पाया पडल्या.

Sudha Murthy (संग्रहित संपादित प्रतिमा)

सुप्रसिद्ध लेखिका आणि सामाजिक कार्यकर्त्या सुधा मूर्ती (Sudha Murthy) यांचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. या व्हिडिओमध्ये त्या हिंदुत्ववादी नेते संभाजी भिडे (Sambhaji Bhide) यांच्या पाया पडताना दिसत आहे. हा व्हिडीओ समोर आल्यानंतर सोशल मिडियावर चर्चेला उधान आले होते. सुधा मूर्ती संभाजी भिडे यांना पाठींबा देतात का? असा प्रश्न लोकांच्या मनात निर्माण झाला होता. या व्हिडीओमुळे निर्माण झालेल्या गदारोळात आता सुधा मूर्ती यांनी घडलेल्या प्रकारावर स्पष्टीकरण दिले आहे.

सुधा मूर्ती यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्य़ातील त्यांच्या वास्तव्यादरम्यान प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना सांगितले की, त्यांच्या पुस्तकांच्या प्रचार कार्यक्रमात वाचकांशी संवाद साधण्यासाठी त्या सोमवारी सांगलीत आल्या होत्या. यादरम्यान संभाजी भिडे यांना त्यांना भेटायचे होते. त्या म्हणाल्या, ‘मला संभाजी भिडेंबद्दल माहिती नव्हती आणि संभाजी भिडे कोण आहेत हे देखील ठाऊक नव्हते. ते वयाने मोठे आहेत म्हणून मी त्यांच्या पाया पडले.’ फेब्रुवारीमध्ये त्या भिडे यांना भेटण्याचा प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

सुधा मूर्ती या सुप्रसिद्ध लेखिका असून त्यांच्या अनेक पुस्तकांचे मराठीत भाषांतर झाले आहे. सुधा मूर्ती यांनी सोमवारी (7 नोव्हेंबर, 2022) सांगली, महाराष्ट्रात आयोजित केलेल्या कार्यक्रमात त्यांच्या मराठीत छापलेल्या काही पुस्तकांच्या प्रचारासाठी हजेरी लावली होती. या कार्यक्रमस्थळी संभाजी भिडेही त्यांच्या अनेक समर्थकांसह उपस्थित होते. त्याच ठिकाणी मूर्ती यांनी संभाजी भिडे यांची भेट घेतली. त्यांच्या भेटीचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

सांगलीतील कार्यक्रमाचे आयोजक आणि सुधा मूर्ती यांची मराठीत पुस्तके प्रकाशित करणाऱ्या मेहता पब्लिशिंग हाऊसच्या संपादकीय प्रमुख योजना यादव यांनी फेसबुकवर या संपूर्ण घटनेबद्दल सविस्तर लिहिले आहे. संभाजी भिडेंना भेटण्यासाठी स्थानिक पोलिसांनी सुधा मूर्ती यांच्यावर दबाव आणल्याचा दावा त्यांनी केला. योजना यादव यांच्या म्हणण्यानुसार, सुधा मूर्ती यांनी कोणालाही भेटण्यास नकार दिला होता, मात्र भिडे यांचे समर्थक कोणतेही निमंत्रण न देता कार्यक्रमाला पोहोचले होते. सभागृहाबाहेर मोठ्या संख्येने भिडे समर्थकांची उपस्थितीमुळे स्थानिक पोलीस दबले आणि त्यांनी सुधा मूर्ती यांना भिडे यांची भेट घेण्याची विनंती केली. (हेही वाचा: Sanjay Raut यांना मांडवली करायची असती तर 100 दिवस जेल मध्ये राहिले नसते - उद्धव ठाकरे; मातोश्री वर राऊतांचं जंगी स्वागत)

योजना यादव यांनी पुढे लिहिले की, सुधा मूर्ती यांना भिडे कोण आहेत हे माहित नव्हते परंतु दबावामुळे अवघ्या काही मिनिटांसाठी त्या भिडे यांना भेटण्यास तयार झाल्या. भिडे वयाने मोठे असल्याने त्या त्यांच्या पाया पडल्या. नंतर यादव यांनी असेही लिहिले की, त्यांनी सुधा मूर्ती यांना सावध केले की भिडे यांच्या भेटीच्या दृश्याचा प्रचारासाठी वापर केला जाऊ शकतो.

मात्र श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान संघटनेचे सांगली प्रमुख हनुमंत पवार यांनी योजना यादव यांचे सर्व दावे फेटाळून लावले आहेत. सांगली पोलीस ठाण्याचे प्रमुख अभिजित देशमुख यांनी बीबीसी मराठीला सांगितले की, सुधा मूर्ती या सुप्रसिद्ध महिला आहेत, त्यामुळे त्यांचा कार्यक्रम लक्षात घेऊन पोलिसांनी पुरेसा पोलीस बंदोबस्त तैनात केला होता. संभाजी भिडेंना भेटण्यासाठी पोलिसांनी आयोजकांवर किंवा सुधा मूर्ती यांच्यावर कोणताही दबाव आणल्याचा आरोप अभिजित देशमुख यांनी स्पष्टपणे नाकारला.

दरम्यान, सुधा मूर्ती आणि संभाजी भिडे यांची ही भेट वादग्रस्त ठरली कारण, संभाजी भिडे हे हिंदू उजव्या विचारसरणीचे नेते आहेत आणि सुधा मूर्ती या टेक कंपनी इन्फोसिसचे संस्थापक नारायण मूर्ती यांच्या पत्नी आणि सध्याचे ब्रिटीश पंतप्रधान ऋषी सुनक यांच्या सासू आहेत.