समीर वानखेडे यांच्यावर होत असलेल्या आरोपांवर गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांची प्रतिक्रीया; पहा काय म्हणाले
आर्यन खानच्या सुटकेसाठी समीर वानखेडे यांनी 25 कोटींची मागणी केल्याचा आरोप प्रभाकर साईल यांनी केला असून त्यावर आता राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी आपली प्रतिक्रीया दिली आहे.
आर्यन खान ड्रग्स प्रकरणी (Aryan Khan Drugs Case) एनसीबी (NCB) अधिकारी समीर वानखेडे (Sameer Wankhede) आणि राज्याचे मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांच्या गेल्या अनेक दिवसांपासून आरोप-प्रत्यारोप सुरु आहेत. यासंदर्भात दिवसेंदिवस नवनवी माहिती समोर येत आहे. आर्यन खानच्या सुटकेसाठी समीर वानखेडे यांनी 25 कोटींची मागणी केल्याचा आरोप प्रभाकर साईल (Prabhakar Sail) यांनी केला असून त्यावर आता राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील (Dilip Walse Patil) यांनी आपली प्रतिक्रीया दिली आहे.
गृहमंत्री म्हणाले की, "प्रभाकर साईल यांनी केलेले अॅफिडेव्हीट माझ्या पाहण्यात आलं आहे. त्यांना त्यांच्या जीवाची भीती असल्याने त्यांनी पोलिस संरक्षण मागितलं होते. मुंबई पोलिसांनी ते त्यांना दिलं आहे." नवाब मलिक वानखेडेंवर करत असलेल्या आरोपासंदर्भात त्यांना विचारले असता ते म्हणाले की, "नवाब मलिक आणि माझी भेट अद्याप झालेली नाही. ते निवडणूकीच्या प्रचारात व्यस्त आहेत. त्यांची भेट झाल्यानंतर त्यांचं म्हणणं समजून घेतलं जाईल. त्यानंतर पुढील कारवाई करण्यात येईल." (Nawab Malik यांचा Sameer Wankhede यांच्याबाबत अजून एक गौप्यस्फोट; ट्वीट केले जातप्रमाणपत्र)
तसंच प्रभाकर साईल याने तक्रार दाखल केल्यास एफआयर दाखल करुन पोलिस त्यांची पुढील कारवाई करतील, असंही त म्हणाले. या विषयावर मुख्यमंत्र्यांशी जुजबी चर्चा झाल्याचेही त्यांनी सांगितले. दरम्यान, आतापर्यंत केंद्रीय यंत्रणांचा इतका वापर कधीही झाला नव्हता. अलिकडच्या काळात या यंत्रणांचा वापर अतिरिक्त होत असल्याचेही ते म्हणाले. (Aryan Khan Drugs Case: 25 कोटी खंडणीचा आरोप NCB ने फेटाळला; Press Note जारी करत केला खुलासा)
क्रुझ ड्रग्स पार्टी प्रकरणात आर्यन खान याला अटक केल्यानंतर समीर वानखेडे यांच्यावर नवाब मलिक यांच्याकडून जोरदार टीका होऊ लागली. अद्याप आरोपांची मालिका संपली नसून दिवसेंदिवस नवनवे आरोप त्यांच्याकडून वानखेडेंवर केले जात आहेत. दरम्यान, हे सर्व आरोप समीर वानखेडे आणि एनसीबीने फेटाळून लावले आहेत.