Heat Strokes: पारा वाढला! राज्यात उष्माघाताचे 8 बळी, 111 जण रुग्णालयात दाखल
या काळात शरीराचे डिहायड्रेशन होते, उष्णतेने पेटके येणे, अतीव थकवा किंवा उष्माघातासारखे त्रास उद्भवतात. उष्णतेने पेटक्यांसह स्नायूंना सूज, चक्कर आणि तापही येतो
राज्यातील तापमान (Maharashtra Temperature) दिवसेंदिवस वाढत आहे. राज्यात उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. वाशिम, वर्धा, चंद्रपूर, अमरावतीमध्ये तापमान 42 अंशाहून अधिक आहे. वातावरणातील तापमान वाढल्यावर शरीरातील पाणी कमी होऊन उद्भवणारा गंभीर आजार म्हणजे उष्माघात (Heat Strokes). आता राज्याच्या आरोग्य विभागाने गेल्या एका आठवड्यात संपूर्ण महाराष्ट्रात उष्माघाताने आठ मृत्यूंची नोंद केली आहे. जळगाव जिल्ह्यात तीन, तर नागपूरमध्ये दोन आणि अकोला, अमरावती आणि उस्मानाबाद येथे प्रत्येकी एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे.
जिल्हा मृत्यू समित्यांनी सर्व आठ मृत्यू उष्माघाताने झाल्याची पुष्टी केली आहे, तर जवळपास 111 जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. येत्या काही दिवसांत तापमानात वाढ होणार असल्याने मृत्यूची संख्या ही चिंतेची बाब असल्याचे आरोग्य तज्ज्ञांनी सांगितले. परंतु ढगाळ वातावरणामुळे उत्तर भारतात काही दिवस उष्णतेच्या लाटेपासून दिलासा मिळण्याची शक्यता आहे. आयएमडीचे डीजीएम आरके जेनामानी म्हणाले, ‘दिल्ली, पंजाब, राजस्थान आणि हरियाणामध्ये ढगांच्या वाढत्या उपस्थितीमुळे तापमान 2-3 डिग्री सेल्सिअसने कमी होईल आणि उष्णतेची लाट निघून जाईल.’
भारतीय हवामान खात्याने (IMD) दक्षिण भारतातील अनेक राज्यांमध्ये 15 एप्रिलपर्यंत पावसाचा अंदाज वर्तवला आहे. हवामान खात्याच्या ताज्या अंदाजानुसार पुढील तीन दिवस केरळ, तामिळनाडू, आंध्र प्रदेश, कर्नाटक आणि केंद्रशासित प्रदेश पुद्दुचेरीमध्ये पावसाची शक्यता आहे. (हेही वाचा: शहरी जंगल असलेल्या मुंबईचा UN च्या 'ट्री सिटीज ऑफ द वर्ल्ड’ यादीत समावेश)
दरम्यान, भारतात उन्हाळय़ात म्हणजे मार्च ते जूनदरम्यान उष्णतेच्या लाटा येत असतात. या काळात शरीराचे डिहायड्रेशन होते, उष्णतेने पेटके येणे, अतीव थकवा किंवा उष्माघातासारखे त्रास उद्भवतात. उष्णतेने पेटक्यांसह स्नायूंना सूज, चक्कर आणि तापही येतो. थकवा, अशक्तपणा, डोकेदुखी, उलटय़ा, मळमळ, घाम येणे ही लक्षणेही जाणवतात. उष्माघातासारख्या त्रासात अस्वस्थता जाणवून व्यक्ती कोमात जाते. ही स्थिती प्राणघातक असू शकते. त्यामुळे उन्हाळ्यामध्ये तब्येतीची विशेष काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.