'आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी राजीनामा द्यावा'; आरोग्य विभागाच्या परीक्षेच्या गोंधळानंतर अतुल भातखळकर यांची मागणी (Watch Video)
परीक्षेत झालेल्या गोंधळाची ही दुसरी वेळ असल्याने विरोधक आक्रमक झाले आहेत. आमदार अतुल भातखळकर यांनी थेट आरोग्यमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.
राज्यात आरोग्य विभागाच्या परीक्षेवरुन (Maharashtra Public Health Department Exam) एकच गोंधळ उडाला आहे. परीक्षेत झालेल्या गोंधळाची ही दुसरी वेळ असल्याने विरोधक आक्रमक झाले आहेत. भाजप आमदार अतुल भातखळकर (BJP MLA Atul Bhatkhalkar) यांनी थेट आरोग्यमंत्री राजेश टोपे (Health Minister Rajesh Tope) यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. ट्विटद्वारे व्हिडिओ शेअर करत त्यांनी आपला संताप व्यक्त केला आहे. तसंच ‘टोपे साहेब आता विद्यार्थ्यांसाठी हेलिकॉप्टरची व्यवस्था कराच’ असा टोलाही लगावला आहे.
अतुल भातखळकर व्हिडिओत म्हणाले की, "सप्टेंबर महिन्यात आरोग्य विभागातील नोकर भरतीच्या वेळी जो गोंधळ राजेश टोपे यांनी घातला तोच गोंधळ आता पुढच्या रविवारी होणाऱ्या परीक्षेच्या बाबतीत आहे. एकाच दिवशी दोन परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांची सेंटर्स 100 किमीच्या अंतरावर आहेत. टोपे साहेब आता या सर्व विद्यार्थ्यांना हेलिकॉप्टरची सोय करुन द्या. कारण पुण्याचा मनुष्य वाशिमला कसा जाणार आणि वाशिमला परीक्षा दिलेला पुन्हा पुण्याला कसा जाणार? सगळा भ्रष्टाचार. सगळा गोंधळ."
अतुल भातखळकर ट्विट:
पुढे ते म्हणाले की, "या आयटी कंपनीचा परवाना तात्काळ रद्द करा, अशी मागणी आम्ही त्याच वेळेला केली होती. याचं आणि मंत्रीमंडळातील मंत्र्यांचं काय साटंलोटं आहे त्याचा तपास करा. पण नेहमीप्रमाणेच मुख्यमंत्री ठिम्म. आपल्या घरात बसून आहेत. गेल्या वेळेच्या परीक्षेची नुकसान भरपाई विद्यार्थ्यांना मिळालेली नाही. आता यावेळेची परीक्षा पुढे ढकलण्याची नामुष्की या सरकारवर येणार आहे. त्यामुळे आता तरी राजेश टोपे यांना आरोग्यमंत्रीपदावरुन तात्काळ हकललं पाहिजे आणि या परीक्षा सुनियोजित पद्धतीने घेतल्या पाहिजेत, अशी आमची मागणी आहे."
दरम्यान, 24 ऑक्टोबर रोजी होणाऱ्या आरोग्य विभागाच्या परीक्षेच्या दोन पेपरसाठी परीक्षार्थींना सकाळी एका वेगळ्या जिल्ह्यात आणि दुपारी वेगळ्या जिल्ह्यात केंद्र देण्यात आलं आहे. यावरुनच भातखळकरांनी सरकारवर जोरदार टीका केली आहे. विशेष म्हणजे या गोंधळावरुन रोहित पवार यांनी देखील सरकारला घरचा आहेर दिला असून यापुढे सर्वच परीक्षा एमपीएससी मार्फत घेण्याची विनंती केली आहे.