IPL Auction 2025 Live

मुंबईबाबतच्या केलेल्या वक्तव्यावर राज्यपाल Bhagat Singh Koshyari यांनी मागितली माफी, दिले 'हे' स्पष्टीकरण

शिवसेना अध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी राज्यपाल कोश्यारी यांनी मुंबईबाबत केलेल्या वक्तव्याबद्दल माफी मागावी अशी मागणी केली होती.

Governor Bhagat Singh Koshyari (Photo Credit - Twitter)

महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांच्या मुंबईबाबतच्या वक्तव्यावरुन वाद निर्माण झाला आहे. मुंबईच्या पश्चिम उपनगरातील अंधेरी येथील एका चौकाच्या नामकरण समारंभाला संबोधित करताना कोश्यारी शुक्रवारी (29 जुलै) म्हणाले होते, ‘मला इथल्या लोकांना सांगायचे आहे की जर गुजराती आणि राजस्थानींना महाराष्ट्रातून, विशेषतः मुंबई आणि ठाण्यातून जावे लागले तर, मुंबईकडे ना पैसा असेल, ना आर्थिक राजधानी अशी ओळख,‘ राज्यपालांच्या या वक्तव्यानंतर मोठा गदारोळ माजला होता. शिवसेना अध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी राज्यपाल कोश्यारी यांनी मुंबईबाबत केलेल्या वक्तव्याबद्दल माफी मागावी अशी मागणी केली होती.

आता राज्यपालांनी या वक्तव्याबाबत स्पष्टीकरण दिले आहे. ते म्हणतात- ‘दिनांक 29 जुलै रोजी अंधेरी येथे झालेल्या एका सार्वजनिक कार्यक्रमात मुंबईच्या विकासात देशातील काही समाज बांधवांच्या योगदानाचे कौतुक करताना माझ्याकडुन कदाचित काही चुक झाली. महाराष्ट्रच नाही तर संपूर्ण देशाच्या विकासात सर्वांचेच उल्लेखनीय असे योगदान आहे. विशेषतः संबंधित राज्याची सर्वसमावेशकता व सर्वांना सोबत घेऊन वाटचाल करण्याची आपली उज्वल परंपरा यामुळेच आज आपला देश प्रगती पथावर अग्रेसर होत आहे.’

‘गेल्या जवळपास तीन वर्षांत मला राज्यातील जनतेचे अपार प्रेम मिळाले आहे. आपल्या वतीने मी महाराष्ट्र आणि मराठी भाषेचा गौरव वाढवण्याचा कसोशीने प्रयत्न केला. परंतु,  त्या दिवशीच्या भाषणात माझ्याकडून निर्हेतुकपणे काही चूक झाली असेल तर त्या चुकीला या थोर महाराष्ट्र राज्याचा अवमान समजला जाईल ही कल्पना देखील मला करवत नाही.’ (हेही वाचा: शिंदे सरकारचे लक्ष राज्यातील जनतेच्या हितावर नव्हे तर गलिच्छ राजकारणावर, आदित्य ठाकरेंची वक्तव्य)

‘महाराष्ट्राच्या महान संतांच्या शिकवणीला अनुसरून राज्यातील जनता या विनम्र राज्यसेवकाला क्षमा करुन आपल्या विशाल अंतःकरणाचा पुनर्प्रत्यय देईल असा विश्वास बाळगतो.’