German Language Training: वुटेनबर्ग येथे 30 प्रकारच्या क्षेत्रांमध्ये रोजगाराच्या संधी उपलब्ध; मुंबईत 15 केंद्रांवर दिले जाणार मोफत जर्मन भाषेचे प्रशिक्षण, जाणून घ्या सविस्तर
यासाठी आरोग्य सेवा, आदरातिथ्य, विविध क्षेत्रातील कारागीर आदी 30 क्षेत्र निवडण्यात आली आहेत.
German Language Training: राज्यातील होतकरू तरुणांना जर्मनीत रोजगाराची संधी उपलब्ध झाली आहे. यासाठी आवश्यक असलेले जर्मन भाषेचे प्रशिक्षण देण्याचा उपक्रम शालेय शिक्षण विभागाने हाती घेतला असून, मुंबईमध्ये 15 केंद्रांवर असे प्रशिक्षण मिळणार असल्याची माहिती, मुंबई प्रादेशिक विद्या प्राधिकरणच्या प्राचार्य मनीषा पवार यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली. राज्य शासनाने कुशल मनुष्यबळ पुरविण्यासाठी जर्मनीतील बाडेन वुटेनबर्ग राज्यासोबत करार केला आहे. यानुसार बाडेन वुटेनबर्ग येथे विविध 30 प्रकारच्या क्षेत्रांमध्ये रोजगाराची संधी उपलब्ध झाली आहे. त्याकरिता आवश्यक असणारे जर्मन भाषेचे प्रशिक्षण गोथ्ये या जर्मनीतील प्राधिकृत संस्थेमार्फत दिले जाणार आहे. या प्रशिक्षणासाठी राज्यातील तरुणांनी नोंदणी करण्याचे आवाहन राज्य शासनामार्फत करण्यात आले आहे.
पथदर्शी तत्वावर सुरुवातीला महाराष्ट्र शासनातर्फे बाडेन वुटेनबर्ग राज्याला 10 हजार कुशल मनुष्यबळ तातडीने पुरविण्यात येणार आहे. यासाठी आरोग्य सेवा, आदरातिथ्य, विविध क्षेत्रातील कारागीर आदी 30 क्षेत्र निवडण्यात आली आहेत. (हेही वाचा: Chip Assembly Plant in Assam: 27 हजार रोजगार निर्माण करण्यासाठी रतन टाटा 27 हजार कोटी रुपये खर्च करणार; काय आहे संपूर्ण योजना? वाचा)
जर्मनीमध्ये रोजगाराच्या संधीसाठी इच्छुक तरुणांनी नोंदणी केल्यानंतर त्यांना राज्य शासनामार्फत मोफत प्रशिक्षण दिले जाणार आहे. या प्रशिक्षणाकरिता राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद यांनी सुरू केलेल्या https://www.maa.ac.in/GermanyEmployment/ या लिंकवर नोंदणी करता येणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. जर्मन भाषा शिकविण्यासाठी आवड असणाऱ्या शिक्षकांनी सुद्धा आपली नोंदणी करण्याचे आवाहन या निमित्ताने करण्यात आले आहे.
या 15 केंद्रांवर मिळणार प्रशिक्षण-
प्रादेशिक विद्या प्राधिकरण अंतर्गत मुंबई जिल्ह्यातील पुढील 15 केंद्रांवर जर्मन भाषा प्रशिक्षण दिले जाणार आहे. श्रीराम वेल्फेअर सोसायटी हायस्कूल, अंधेरी पश्चिम; आई.इ.एस. न्यू इंग्लिश स्कूल, वांद्रे पूर्व; पार्ले टिळक विद्यालय, विलेपार्ले पूर्व; वेसावा विद्यामंदिर, अंधेरी पूर्व; शेठ चुनीलाल दामोदरदास बर्फीवाला हायस्कूल, अंधेरी पश्चिम; सेंट कोलंबा स्कूल, ग्रँड रोड; डी.एस. हायस्कूल, सायन पश्चिम; वालीराम बेहरूमल मेलवाणी मॉडेल हायस्कूल, ग्रँड रोड पश्चिम; अहिल्या विद्यामंदिर, काळाचौकी; एस.एस.एम.एम.सी.एम. गर्ल्स हायस्कूल, काळाचौकी; ओ.एल.पी.एस. हायस्कूल, चेंबूर; वाणी विद्यालय हायस्कूल, मुलुंड पश्चिम; पंत वालावलकर माध्यमिक विद्यालय, कुर्ला पूर्व; शेठ धनजी देवशी राष्ट्रीय शाळा, घाटकोपर पूर्व आणि संदेश विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, विक्रोळी पूर्व.