शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचा दिलदारपणा; 182 गावांमधील तब्बल 300 मंडळांना प्रसादासाठी धान्याची मदत

सातारा व जावळी तालुक्‍यातील तब्बल 182 गावांमधील गणेशोत्सव मंडळांना प्रसादासाठी त्यांनी धान्य पुरवले आहे. त्यांच्या या कामाचे आता तळागाळातून कौतुक सुरु आहे.

शिवेंद्रराजे भोसले (संग्रहित संपादित प्रतिमा)

साताराचे माजी आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले (Shivendrasinh Raje Bhosale) अखेर भाजपवासी झाले आहेत. त्यानंतर त्यांच्या सामाजिक कार्यांचा जोर चांगलाच वाढत आहे. सध्या सर्वत्र गणेशोत्सवाची (Ganeshotsav 2019) धामधूम दिसून येत आहे. त्यात सातारा जिल्ह्यात पावसाचेही आगमन झाले आहे. हेच औचित्य साधून शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी आपला दिलदारपणा दाखवला आहे. सातारा व जावळी तालुक्‍यातील तब्बल 182 गावांमधील गणेशोत्सव मंडळांना प्रसादासाठी त्यांनी धान्य पुरवले आहे. त्यांच्या या कामाचे आता तळागाळातून कौतुक सुरु आहे.

सध्या पावसाचे दिवस सुरु आहेत, अशा काळात अनेक वाडी, वस्ती किंवा दुर्गम परिसरातील लोकांना खरेदीसाठी सारखे सारखे बाहेर पडणे शक्य नसते. त्यात गणेशोत्सव सुरु असल्याने महत्वाचा आहे तो प्रसाद हेच ओळखून शिवेंद्रसिंहराजे यांनी साखर आणि रवा वाटण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार त्यांचे कार्यकर्ते गेल्या दोन दिवसांपासून सातारा आणि जावळी तालुक्‍यातील प्रत्येक गावात, वाडीवस्तीवर जाऊन गणेश मंडळांना प्रसादासाठी रवा आणि साखर भेट देत आहेत. (हेही वाचा: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी आमदार धनराज महाले शिवबंधनात अडकले, उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेना प्रवेश)

यामध्ये सैदापूर, पानमळेवाडी, रामनगर, कुशी, नागेवाडी, रायगाव, खर्शी, कुडाळ, करहर, मेढा, केळघर, आनेवाडी, सोमर्डी, बामणोली, कास, रेंगडी, गांजे, आंबेघरसह परिसरातील 180 गावांचा समावेश आहे. 5 किलो साखर आणि 5 किलो रवा यांचा लाभ 300 सार्वजनिक मंडळांनी घेतला आहे. सोबतच मंडळातील कार्यकर्त्यांना टी शर्टचेही वाटप करण्यात आले आहे.