FYJC Admissions: अकरावी सीईटी परीक्षेपूर्वी विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी करता येणार मोफत रजिस्ट्रेशन
मुंबई, पुणे, पिंपरी-चिंचवड, नाशिक, अमरावती, नागपूर या महापालिका क्षेत्रातील प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने होणार आहे.
दहावीच्या निकालानंतर राज्यात अकरावी प्रवेशाची प्रक्रीया सुरु करण्यात आली आहे. मुंबई, पुणे, पिंपरी-चिंचवड, नाशिक, अमरावती, नागपूर या महापालिका क्षेत्रातील प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने होणार आहे. ही प्रक्रीया सुलभ व्हावी यासाठी विद्यार्थी नोंदणी व अर्ज भरण्याची सुविधा सुरू करण्यात आली आहे. 16 ऑगस्टपासून प्रत्यक्ष अर्ज भरण्याची प्रक्रीया सुरु होईल. तर 13 ऑगस्टपासून विद्यार्थ्यांना सरावासाठी संकेतस्थळावर मोफत रजिस्ट्रेशन करण्याची सुविधा देण्यात आली आहे. (Maharashtra FYJC CET 2021 Exam Date: 11 वी प्रवेशासाठी ऐच्छिक सीईटी परीक्षा 21 ऑगस्टला; इथे पहा परीक्षेचं स्वरूप ते अर्जाचे अपडेट्स)
मोफत रजिस्ट्रेशन प्रवेश प्रक्रियेअंतर्गत विद्यार्थ्यांना ऑनलाईन नोंदणी करणे, लॉग इन आयडी-पासवर्ड तयार करणे. तसंच मिळालेल्या लॉग इन आयडी व पासवर्ड वापरून लॉग इन करून प्रवेशासाठी अर्जाचा भाग एक भरणे आणि शुल्क, फॉर्म लॉक करणे, अशा गोष्टी करता येणार आहेत.
यापुढील प्रक्रीया 16 ऑगस्टपासून करता येणार आहे. यात अर्जातील माहिती शाळा किंवा मार्गदर्शन केंद्रावरून प्रमाणित करून घेण्यासाठी शाळा मार्गदर्शक केंद्र निवडणे आणि आपला अर्ज व्हेरिफाईड झाला आहे याची खात्री देखील करुन घेता येणार आहे. 17 ऑगस्टपासून विद्यार्थी आपला अर्ज व्हेरिफाय झाला आहे की नाही याची खात्री करुन घेऊ शकतील.
अकरावी प्रवेशासाठी सीईटी परीक्षा 21 ऑगस्ट रोजी होणार आहे. त्यापूर्वी विद्यार्थ्यांना अकरावी प्रवेशाचा भाग-1 भरता येईल. सीईटी परीक्षा झाल्यानंतर अकरावी प्रवेशाचा भाग-2 भरण्यासाठी वेळापत्रक जाहीर करण्यात येईल.
यंदा दहावीचा निकाल 16 जुलै रोजी लागला. कोविड-19 संकटामुळे परीक्षा रद्द करण्यात आल्याने अंतर्गत मुल्यमापन पद्धतीने गुण देण्यात आले आहेत. यावर्षी राज्याचा दहावीचा निकाल 99.95% इतका लागला आहे.