Eknath Khadse On BJP: चाळीस वर्षे भाजपसोबत राहिलो, पक्ष सोडताच माझ्या मागे ईडी लावली, एकनाथ खडसे यांची खंत

मी चाळीस वर्षे तुमच्यासोबत होतो. तेव्हा मी आपल्यासाठी चांगला होतो. मात्र, भाजप सोडून एकच वर्ष झाले तेव्हा मात्र आपण माझ्यापाठीमागे ईडी लावली, अशी खंत खडसे यांनी बोलून दाखवली.

Eknath Khadse | (Photo Credits: Facebook)

राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पक्षाचे नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी भाजपवर (BJP) जोरदार निशाणा साधला आहे. मी चाळीस वर्षे तुमच्यासोबत होतो. तेव्हा मी आपल्यासाठी चांगला होतो. मात्र, भाजप सोडून एकच वर्ष झाले तेव्हा मात्र आपण माझ्यापाठीमागे ईडी लावली, अशी खंत खडसे यांनी बोलून दाखवली. या वेळी बोलताना खडसे यांनी भाजप तळागाळात वाढविण्यासाठी मी प्रयत्न केले. मेहनत घेतली. या मेहनतीचेच फळ आता अनेक लोक घेत आहेत, असा टोलाही खडसे यांनी या वेळी लगावला. ते जळगावातील रावेर येथे एका कार्यकर्ता मेळाव्यात बोलत होते.

एकनाथ खडसे यांनी भाजपवर टीका करत म्हटले की, आज अनेक नेते असे आहेत जे एकनाथ खडसे यांच्यामुळे मोठे झाले. त्यांना मी पक्षाच्या माध्यमातून मोठे केले. कोणी पंचायत समिती सदस्य, पंचायत समिती सभापती, जिल्हा परिषद सदस्य केले, जिल्हा परिषद अध्यक्ष केले. हे सगळे करताना प्रचंड मेहनत लागली. मोठ्या कष्टाने ही माणसे मोठी केली. पक्षवाढीसाठी रक्ताचे पाणी करत आम्ही रस्त्यावर फिरत होतो. 30 वर्षांपूर्वी मी केवळ एकटाच आमदार होतो. आज पक्ष वाढला गावोगावी पोहोचला. सर्वांना सोबत घेऊन जाण्याचा प्रयत्न केला आम्ही, अशी भावना खडसे यांनी व्यक्त केली. (हेही वाचा, OBC Reservation: ओबीसी आरक्षणाच्या मुद्यावरुन खडाखडी, रोहिणी खडेसे यांची टीका रक्षा खडसे यांच्याकडून प्रत्युत्तर)

दरम्यान, जळगाव जिल्ह्यात एकनाथ खडसे विरुद्ध गिरीश महाजन असा सामना पुन्हा एकदा सुरु झाला आहे. जळगावमध्ये अनेक ठिकाणी ईडीचे छापासत्र सुरु झाले आहे. दरम्यान, एकनाथ खडसे यांच्यावर टीका करताना खडसे यांना वेड्यांच्या इस्पितळात दाखवायला हवे अशी टीका झाली होती. त्यावर उत्तर देताना मला वेड्यांच्या इस्पीतळात दाखवायचे तर गिरीश महाजन यांना बुधवारपेठेत दाखवायला पाहिजे असे खडसे यांनी म्हटले होते.