Mumbai Local प्रवासासाठी वेळेच्या निर्बंधामुळे व्यावसायिकांकडून कामकाजाच्या वेळेत बदल

मात्र यासाठी वेळेची मर्यादा असल्याने सर्वसामान्य नागरिकांची होणारी गैरसोय कायम आहे.

Mumbai Local (Photo Credits: PTI)

कोविड-19 (Covid-19) संकटामुळे बंद असलेली लोकलसेवा सर्वसामान्यांसाठी खुली करण्यात आली आहे. मात्र यासाठी वेळेची मर्यादा असल्याने सर्वसामान्य नागरिकांची होणारी गैरसोय कायम आहे. अशावेळी अनेक दुकानदार, कार्यलयांनी आपल्या कामाच्या वेळेत बदल केला आहे. मुंबईत कामानिमित्त येणारे सुमारे 60 टक्के कर्मचारी कापड, सराफा, ऑटोमोबाईल या क्षेत्रात काम करतात. ही सर्व क्षेत्रे अत्यावश्यक श्रेणीत नसल्याने सुमारे 25 लाख कर्मचाऱ्यांना  मुंबई लोकलच्या (Mumbai Local) निर्बंधीत वेळेमुळे गैरसोय होत आहे. त्यामुळे या क्षेत्रातील दुकानदारांनीच आपल्या कामाच्या वेळेत बदल केला आहे.

देशातील एकूण सोन्याचांदीच्या व्यवहारांपैकी 60 टक्के व्यवहार मुंबईत होतात. यामुळे 8 लाख कर्मचारी कार्यरत आहेत. त्यामुळे सकाळी 10 ते 1 ऑनलाईन पद्धतीने व्यवसाय करतात. नंतर निवडक कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत दुपारी 1 वाजता प्रत्यक्ष व्यवसायाला सुरुवात केली जाते. मुंबईतील छोटी कार्यालये देखील अधिक आहेत. त्यांनी देखील वेळेत बदल करत आपली कामे सुरु केली आहेत. (Mumbai Local च्या वेळेत सामान्य नागरिकांसाठी बदल होणार? पहा आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची प्रतिक्रिया)

सर्वसामान्यांना दुपारी 12 ते 4 या वेळेत प्रवासाची मुभा असल्याने दुपारी 12 नंतर या कार्यालयांमध्ये काम सुरु केले जाते. लवकर काम संपवून 4 वाजण्यापूर्वी कर्मचाऱ्यांना घरी पाठवले जाते. (Mumbai Local: विकेंड्स, सुट्टीच्या दिवशी लोकल सर्वसामान्यांसाठी पूर्ण वेळ सुरु करा, रेल्वे प्रवासी संघटनेची मागणी)

दरम्यान, 1 फेब्रुवारीपासून सर्वसामान्यांसाठी मुंबई लोकलसेवा सुरु करण्यात आली. तब्बल 11 महिन्यांनंतर सुरु झालेल्या लोकलसेवेमुळे चाकरमान्यांना दिलासा मिळाला असला तरी प्रवासासाठी वेळेचे निर्बंध घालण्यात आले आहेत.