IPL Auction 2025 Live

अब्दुल सत्तार यांचा राजीनामा म्हणजे महाविकास आघाडी सरकारच्या पतनाला सुरुवात - देवेंद्र फडणवीस

महाविकास आघाडी सरकारमध्ये कॅबिनेट मंत्रीपद न मिळाल्याने सत्तार नाराज होते. त्यामुळे त्यांनी राजीनामा दिल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या आहेत. अशातच आता भाजपने शिवसेनेवर निशाणा साधला आहे. अब्दुल सत्तार यांचा राजीनामा म्हणजे या सरकारच्या पतनाची सुरुवात आहे, अशी टीका माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.

Devendra Fadnavis (PC- Facebook)

आज शिवसेना नेते अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांनी राज्यमंत्रिपदाचा राजीनामा (Resignation) दिला. महाविकास आघाडी सरकारमध्ये कॅबिनेट मंत्रीपद न मिळाल्याने सत्तार नाराज होते. त्यामुळे त्यांनी राजीनामा दिल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या आहेत. अशातच आता भाजपने शिवसेनेवर निशाणा साधला आहे. अब्दुल सत्तार यांचा राजीनामा म्हणजे या सरकारच्या पतनाची सुरुवात आहे, अशी टीका माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Former Chief Minister Devendra Fadnavis) यांनी केली आहे. फडणवीस आज वाशिममध्ये जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचारसभेत बोलत होते.

यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारवर टीकेची तोफ डागली. सर्वच मंत्र्यांना मलाईदार मंत्रालय पाहिजे आहे. मलाईदार मंत्रालय मिळावे यासाठी सर्वांचा संघर्ष सुरू आहे. कोणालाही कृषी खाते नको आहे. प्रत्येकाला चांगली खाते हवे आहेत. विशेष म्हणजे अद्यापही खातेवाटप झालेले नाही. हे विश्वासघाताचे सरकार आहे, असा आरोपही फडणवीस यांनी यावेळी केला. यापुढेही असेच नाराज आमदार राजीनामे देऊन हे सरकार कोसळेल, असा दावाही यावेळी फडणवीस यांनी केला. (हेही वाचा - अब्दुल सत्तार यांच्या राजीनाम्याबद्दल मुख्यमंत्री कार्यालयात माहिती नाही- संजय राऊत)

दरम्यान, भाजपच्या अनेक नेत्यांनी अब्दुल सत्तार यांच्या राजीनाम्यानंतर शिवसेनेवर टीका केली. अब्दुल सत्तार यांचा राजीनामा म्हणजे बोहल्यावर चढण्याआधीच नवरदेव पळून जाण्यासारखी स्थिती, असा टोला पुण्याचे खासदार आणि भाजप नेते गिरीष बापट यांनी लगावला आहे. तर अब्दुल सत्तार यांनी राजीनामा का दिला हे मला माहिती नाही, असे शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी म्हटलं आहे.