महाराष्ट्र राज्यात धरणांमध्ये अवघा 32% पाणी साठा, औरंगाबाद येथे भीषण पाणी टंचाई

यंदा धरणांमध्ये केवळ 32.88 टक्के पाणीसाठा आहे.

Dam | Image used for representational purpose | (Photo Credits: ANI Twitter)

महाराष्ट्राच्या धरणांमध्ये (Maharashtra Dams) असलेला पाणीसाठा सध्या चिंतेची बाब बनत चालली आहे. यंदा मागील वर्षाच्या तुलनेत 14% पाणीसाठा कमी असल्याची माहिती देण्यात आली आहे. यंदा धरणांमध्ये केवळ 32.88 टक्के पाणीसाठा आहे. औरंगाबादमध्ये पाणी टंचाई भीषण स्वरूपात आहे. मागील वर्षी 42.67 % पाणीसाठा असलेल्या या धरणांमध्ये यंदा अवघा 7% पाणी साठा असल्याने दुष्काळाची स्थिती उभी राहिली आहे.

महाराष्ट्रामध्ये एकूण 3267 धरणं आहेत. मागील वर्षी याच काळामध्ये धरणात सुमारे 47.74 टक्के पाणीसाठा होता. चंद्रकांत पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसारे पाणीटंचाई असलेल्या भागामध्ये सध्या सरकारकडून सुमारे 2636 टॅकर्स पुरवण्यात आले आहेत. यामुळे ग्रामीण भागात पिण्याच्या पाण्याची सोय करण्यात आली आहे. पुरेसा आणि नियमित पाऊस न झाल्याने ही पाणी टंचाई उद्भवल्याची माहिती देण्यात आली आहे.

कोकणातही पाणीसाठा मागील वर्षीच्या तुलनेत कमी असल्याची माहिती समोर आली आहे. मागील वर्षी कोकणात 61.20% पाणीसाठा होता. तर यंदा त्याचे प्रमाण 55.06% आहे. तर पुण्यात 46.67 % पाणीसाठा आहे. नाशिकमध्ये 29.79% पाणीसाठा आहे. तर अमरावतीमध्ये 31.48% पाणीसाठा उपलब्ध आहे. नागपूरमध्ये अवघा 16.74% पाणीसाठा उपलब्ध आहे.

महाराष्ट्रामध्ये जून ते सप्टेंबर महिन्यात पाऊस पडतो. यादरम्यान धरणांमध्ये साठणारे पाणी उद्योग, शेती आणि पिण्यासाठी वापरले जाते.