Cyber Fraud Through Dating App: मुंबईत डेटिंग ॲपद्वारे 65 वर्षीय महिलेची सायबर फसवणूक; अमेरिकन नागरिक असल्याचे सांगून 1.30 कोटी रुपये लुबाडले

जून 2023 पर्यंत महिलेने त्याला बिटकॉइनच्या रूपात पैसे पाठवले. त्याने महिलेला 2 दशलक्ष डॉलर्स पैसे परत करण्याचे आश्वासन दिले होते. पॉलने महिलेला सांगितले होते की, तो पार्सलद्वारे पैसे परत पाठवेल.

Representational Image (File Photo)

Cyber Fraud Through Dating App: मुंबईत (Mumbai) डेटिंग ॲपच्या (Dating App) माध्यमातून एका 65 वर्षीय महिलेची 1.3 कोटी रुपयांची फसवणूक (Cyber Fraud) झाल्याची बाब समोर आली आये. पोलिसांनी सांगितले की, एप्रिल 2023 मध्ये या महिलेची क्यूपिड नावाच्या आंतरराष्ट्रीय डेटिंग ॲपद्वारे पॉल रदरफोर्ड नावाच्या अमेरिकन अभियंत्याशी भेट झाली. पॉलने तो फिलिपाइन्समध्ये काम करणारा अमेरिकन नागरिक असल्याचे महिलेला सांगितले. हळू हळू दोघांमध्ये बोलणे सुरु झाले. महिलेचा विश्वास जिंकल्यानंतर, एके दिवशी त्याने तिला सांगितले की, बांधकाम साइटवर एक अपघात झाला असून, त्याबाबतची अटक आणि हद्दपारी टाळण्यासाठी त्याला पैशांची गरज आहे.

महिलेला त्याच्यावर विश्वास होता व त्यामुळे तिने त्याला पैसे दिले. जून 2023 पर्यंत महिलेने त्याला बिटकॉइनच्या रूपात पैसे पाठवले. त्याने महिलेला 2 दशलक्ष डॉलर्स पैसे परत करण्याचे आश्वासन दिले होते. पॉलने महिलेला सांगितले होते की, तो पार्सलद्वारे पैसे परत पाठवेल. ही महिला पॉलच्या पार्सलची वाट पाहत होती, अशात तिला प्रिया शर्मा नावाच्या महिलेचा फोन आला. प्रियाने ती दिल्ली विमानतळाची अधिकारी असल्याचे सांगितले.

प्रिया म्हणाली विमानतळ कस्टमकडे एक पार्सल आले असून, दंड भरल्यानंतरच ते सोडले जाईल. प्रियाने पीडितेला पार्सल घेण्यासाठी विविध शुल्क भरण्यास सांगितले. पीडितेने मागण्यांचे पालन केले आणि जून 2023 ते मार्च 2024 दरम्यान वेगवेगळ्या बँक खात्यांमध्ये पैसे ट्रान्सफर केले. सरकारी फीच्या नावाखाली प्रियाने हे पैसे घेतले. पुढे जानेवारी 2024 मध्ये, महिलेशी बँक ऑफ अमेरिका कर्मचारी असल्याचा दावा करणाऱ्या एका व्यक्तीने संपर्क साधला. त्याने सांगितले की, 2 दशलक्ष डॉलर्स कुरिअरद्वारे बँक ऑफ अमेरिकाला परत पाठवले आहेत. ते काढून घेण्यात यावेत. यासाठी त्याने महिलेला एटीएम कार्डही पाठवले. (हेही वाचा: Coldplay Concert Passes Fraud: कोल्डप्ले कॉन्सर्ट पासचे आश्वासन देऊन 18 वर्षीय विद्यार्थ्याची 2.17 लाख रुपयांची फसवणूक; गुन्हा दाखल, तपास सुरु)

यानंतर महिलेला रिझर्व्ह बँक आणि आयएमएफच्या महिला अधिकारी असल्याचे भासवत अनेकांचे फोन येऊ लागले. त्यांनी सांगितले की, त्या डॉलरचे भारतीय रुपयात रूपांतर केल्यास महिलेला 17 कोटी रुपये मिळतील. यानंतर महिलेला नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) कडूनही फोन आला. त्यांनी सांगितले की, बँक ऑफ अमेरिकामधील रक्कम परत केली जात आहे, मात्र त्यासाठी एनपीसीआयला शुल्क भरावे लागेल. महिलेने त्यांनाही पैसेही दिले. यानंतरही महिलेला विविध एजन्सी किंवा प्राधिकरणांकडून दावा करणाऱ्या अनेक लोकांकडून कॉल येत राहिले. तेव्हा महिलेचा संशय वाढला आणि आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले. त्यानंतर महिलेने पश्चिम क्षेत्र सायबर पोलीस ठाण्यात या घटनेबाबत एफआयआर दाखल केला. एका वर्षात महिलेची 1.3 कोटी रुपयांची फसवणूक झाली आहे. सायबर पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.