Crime Against Women: महिलांबाबतच्या गुन्ह्यांमध्ये 30 टक्क्यांनी वाढ; उत्तर प्रदेशात देशातील अर्धी प्रकरणे, जाणून घ्या महाराष्ट्राची स्थिती
या कालावधीत, सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या यूपीमध्ये महिलांविरोधातील गुन्ह्यांच्या सर्वाधिक 15,828 तक्रारी नोंदवल्या गेल्या
देशाची राजधानी दिल्लीत, राष्ट्रीय महिला आयोगाला (NCW) गेल्या वर्षी महिलांविरोधातील गुन्ह्यांच्या (Crime Against Women) सुमारे 31,000 तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. ही संख्या 2014 नंतरचा उच्चांक आहे. यातील निम्म्याहून अधिक प्रकरणे एकट्या उत्तर प्रदेशातील आहेत. त्याचवेळी 2020 च्या तुलनेत 2021 मध्ये महिलांवरील गुन्ह्यांच्या तक्रारींमध्ये 30 टक्क्यांनी वाढ झाली आहे. त्यादरम्यान 23,722 तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. अधिकृत NCW डेटानुसार, 30,864 तक्रारींपैकी बहुतेक 11,013 तक्रारी सन्मानाने जगण्याच्या अधिकाराशी संबंधित होत्या.
त्यापाठोपाठ कौटुंबिक हिंसाचाराच्या 6,633 तक्रारी आणि हुंडाबळीच्या छळाच्या 4,589 तक्रारी आल्या आहेत. या कालावधीत, सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या यूपीमध्ये महिलांविरोधातील गुन्ह्यांच्या सर्वाधिक 15,828 तक्रारी नोंदवल्या गेल्या. यानंतर दिल्लीत 3,336, महाराष्ट्रात 1,504, हरियाणामध्ये 1,460 आणि बिहारमध्ये 1,456 तक्रारी नोंदवण्यात आल्या. सरकारी आकडेवारीनुसार, सन्मानाने जगण्याचा अधिकार आणि कौटुंबिक हिंसाचाराच्या सर्वाधिक तक्रारी उत्तर प्रदेशातून प्राप्त झाल्या आहेत.
2014 पासून NCW कडे प्राप्त झालेल्या तक्रारींची संख्या गेल्या वर्षी सर्वाधिक होती. 2014 मध्ये एकूण 33,906 तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. मात्र, तक्रारींमध्ये वाढ झाल्याचे आयोगाच्या प्रमुख रेखा शर्मा यांनी यापूर्वीच सांगितले होते. आयोग लोकांना त्यांच्या कामाबद्दल अधिक जागरूक करत असल्यामुळेही मोठ्या प्रमाणावर अशी प्रकरणे समोर येत आहेत. याशिवाय आयोगाने नेहमीच महिलांच्या मदतीसाठी नवनवीन उपक्रम सुरू करण्याचे काम केले आहे. या अनुषंगाने गरजू महिलांना आधार, सेवा देण्यासाठी आणि त्यांच्या तक्रारी नोंदवण्यासाठी चोवीस तास हेल्पलाइन क्रमांक सुरू केला आहे.
जुलै ते सप्टेंबर 2021 पर्यंत दर महिन्याला 3,100 पेक्षा जास्त तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. शेवटच्या 3,000 पेक्षा जास्त तक्रारी नोव्हेंबर 2018 मध्ये प्राप्त झाल्या होत्या, जेव्हा भारतातील 'MeToo' चळवळ शिखरावर होती. त्याचप्रमाणे, NCW डेटानुसार, विनयभंग किंवा महिलांची छेडछाड या गुन्ह्यांबाबत 1,819 तक्रारी, बलात्कार आणि बलात्काराच्या प्रयत्नाच्या 1,675 तक्रारी, महिलांबद्दल पोलिसांच्या उदासीनतेच्या 1,537 तक्रारी आणि सायबर गुन्ह्यांच्या 858 तक्रारी प्राप्त झाल्या आहेत.