रत्नागिरी जिल्ह्यात येणा-यांची कोरोना चाचणी बंधनकारक, जिल्हाधिका-यांनी दिली महत्त्वाची माहिती
त्यामुळे विनाकारण बाहेर पडणाऱ्या लोकांवर आता थेट कारवाई केली जाणार आहे.
महाराष्ट्रात कोरोनाची दुसरी लाट ही जोरदार मुसंडी मारत दाखल झाली असून यात अनेकजण कोरोनाच्या विळख्यात अडकत चालले आहेत. त्यामुळे राज्य सरकारने आजपासून 30 एप्रिलपर्यंत कडक निर्बंध लागू केले आहेत. मुंबईसह अन्य जिल्ह्यात कोरोनाचे कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. दरम्यान रत्नागिरी (Ratnagiri) जिल्ह्यात येणा-यांची कोरोना चाचणी बंधनकारक करण्यात आली आहे. रत्नागिरी जिल्हा प्रशासनानं देखील संचारबंदीची कडक अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे विनाकारण बाहेर पडणाऱ्या लोकांवर आता थेट कारवाई केली जाणार आहे.
त्याचबरोबर रत्नागिरी जिल्ह्यात जीवनावश्यक वस्तू या नागरिकांना घरोघरी पोहोचवल्या जाणार असून त्याकरता हेल्पिंग हँड सारखी संस्था किंवा काही सामाजिक संस्था आणि नागरिकांची मदत घेतली जाणार आहे. त्यामुळे नागरिकांना आता घराबाहेर पडण्यासाठी योग्य कारण द्यावं लागणार आहे.हेदेखील वाचा- Coronavirus in Pune: पुण्यात आज 4,206 रुग्णांची नोंद; सध्या शहरात 53,326 सक्रीय रुग्णांवर उपचार सुरु
याचबरोबर जिल्ह्यात येणाऱ्या प्रत्येक नागरिकांची जिल्ह्याच्या प्रवेशद्वारावर कोरोना चाचणी केली जाणार आहे. रेल्वे किंवा बसने येणाऱ्या प्रवाशांची देखील कोरोना चाचणी करून त्याचा अहवाल निगेटिव्ह असल्याची खात्री झाल्यानंतरच त्याला पुढं सोडलं जाणार आहे.
रत्नागिरी जिल्ह्यात प्रवेशासाठी मुंबई - गोवा महामार्गावरील कशेडी, रायगडमधून प्रवेश केल्यानंतर मंडणगड येथे आंबेत आणि आंबा घाटातून खाली उतरल्यानंतर मोर्शी या ठिकाणाहून येता येते. सध्या याच ठिकाणाहून मोठ्या प्रमाणात जिल्ह्यात प्रवेश केला जातो. त्यामुळे जिल्ह्याचे प्रवेशद्वार असलेल्या या ठिकाणी अँटीजेन चाचणी केल्यानंतर, त्याचा अहवाल निगेटिव्ह आल्यानंतर जिल्ह्यात प्रवेश करू इच्छिणाऱ्या प्रत्येकाला पुढं सोडलं जाईल. यावेळी जर का कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली तर मात्र संबंधित व्यक्तिला रूग्णालयात किंवा उपचारासाठी दाखल केले जाईल.