Sanjay Raut Letter To Devendra Fadnavis: आमदार राहुल कुल यांच्या भीमा सहकारी साखर कारखान्यात भ्रष्टाचार; संजय राऊत यांच देवेंद्र फडणवीसांना पत्र
भीमा सहकारी प्रकरण किरीट सोमय्यांकडे चारवेळा पाठवण्यात आलं. मात्र, आता ते म्हणतात शिवसेना राष्ट्रवादी किंवा कॉंग्रेसबद्दल प्रकरणे घेऊन या तरच मी हात लावतो
Sanjay Raut Letter To Devendra Fadnavis: आमदार राहुल कुल (Rahul Kul) यांच्या भीमा सहकारी साखर कारखान्यात भ्रष्टाचार झाला असल्याचा आरोप शिवसेना ठाकरे गट खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केला आहे. यासंदर्भात संजय राऊत यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना पत्र लिहिलं आहे. या पत्रात त्यांनी भाजप आमदार राहुल कुल यांच्यावर भ्रष्टाचाराचा आरोप केला आहे. राहुल कुल हे दौंडमधील भीमा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन आहेत. भीमा सहकारी कारखान्याकडून शेतकऱ्यांची लूट झाली असून 500 कोटींचा घोटाळा झाला असल्याचा आरोप संजय राऊत यांनी पत्रात केला आहे.
दरम्यान, संजय राऊत यांनी यासंदर्भात सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी किरिट सोमय्यासह इतर भाजप नेत्यांना टॅग केलं आहे. देवेंद्र फडणवीस यांच्याकडे भीमा सहकारी साखर कारखान्यातील भ्रष्टाचाराचं प्रकरण पाठवण्यात आलं आहे. संजय राऊत यांनी म्हटलं आहे की, माझ्याकडे 17 कारखान्यांची प्रकरण आली आहेत. यात राहूल कूल यांच्या साखर कारखान्यात मोठा भ्रष्टाचार झाल्याचं उघडकीस आलं आहे. त्यामुळे या प्रकरणाची चौकशी करण्यात यावी. (हेही वाचा - शीतल म्हात्रे, आमदार प्रकाश सुर्वे यांचा व्हिडिओ देशभर व्हायरल)
यासंदर्भात बोलताना संजय राऊत म्हणाले, राजकीय विरोधकांच्या मागे तपास यंत्रणा लावल्या आहेत. भीमा सहकारी प्रकरण किरीट सोमय्यांकडे चारवेळा पाठवण्यात आलं. मात्र, आता ते म्हणतात शिवसेना राष्ट्रवादी किंवा कॉंग्रेसबद्दल प्रकरणे घेऊन या तरच मी हात लावतो, असा उपरोधिक टोलाही यावेळी संजय राऊत यांनी लगावला.
कोण आहेत राहुल कुल?
राहुल कुल हे पुण्यातल्या दौंड विधानसभा मतदार संघाचे भाजपचे आमदार आहेत. काही दिवसांपूर्वी राहुल कुल यांचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. ज्यामध्ये त्यांनी जेजूरी येथे आपल्या पत्नीला उचलून घेऊन पायऱ्या चढल्या होत्या. राहुल कुल यांच्या पत्नी कांचन कुल यादेखील राजकारणी आहेत. राहुल कुल हे राष्ट्रीय समाज पक्षाचे आमदार होते. मात्र, 2019 मध्ये त्यांनी भाजपात प्रवेश केला. त्यावेळी ते विधानसभा निवडणुकीत भाजपच्या तिकिटावर निवडून आले.