Coronavirus: लॉकडाउनच्या पार्श्वभुमीवर दादर, भायखळा येथील भाजीमार्केट नागरिकांसाठी सुरु राहणार
त्यामुळे अत्यावश्यक सेवासुविधा सुरु राहाणार असल्याचे ही त्यांनी स्पष्ट केले होते.
देशभरात थैमान घालत असलेल्या कोरोना व्हायरसमुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी देशभरात येत्या 14 एप्रिल पर्यंत लॉकडाउनचा आदेश दिला आहे. त्यामुळे अत्यावश्यक सेवासुविधा सुरु राहाणार असल्याचे ही त्यांनी स्पष्ट केले होते. तर महाराष्ट्रात कोरोनाबाधितांचा आकडा 124 वर पोहचल्याने सरकार यावर वेळोवेळी ठोस पावले उचलत आहेत. मात्र लॉकडाउनच्या परिस्थितीत आता मुंबईतील दादर, भायखळा येथील भाजीमार्केट नारिकांसाठी सुरु राहणार आहे. त्याचसोबत नवी मुंबईतील कृषी उत्पन्न बाजार समिती सुद्धा आजपासून सुरु होणार असल्याची माहिती अन्न, नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी दिली आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गेल्या दोन दिवसांपूर्वीच लॉकडाउनच्या पार्श्वभुमीवर व्हिडिओ कॉन्फरसिंगद्वारे नागरिकांशी बातचीत केली. त्यावेळी उद्धव ठाकरे यांनी आपल्याकडे पुरेसा अन्नधान्य साठा असल्याने नागरिकांनी काळजी घेण्याचे काही कारण नसल्याचे म्हटले आहे. त्यानंतर आता दादर, भायखळा मधील भाजीमार्केट सुरु राहणार असल्याने नागरिकांना त्याची खरेदी करता येणार आहे. परंतु या काळात नागरिकांनी गर्दी करु नये असे ही आवाहन करण्यात आले आहे.(होम क्वारंटाईनचा शिक्का असतानाही एक व्यक्ती कोल्हापूर येथील अंबाबाईच्या दर्शनाला; गुन्हा दाखल)
पोलिसांनी भाजीपाल्याची वाहतूक करणाऱ्या गाड्यांना अडवू नये असे छगन भुजबळ यांनी स्पष्ट केले आहे. तसेच भाजीपाल्याची रिकामी वाहने परत जात असतील तर त्यांना जाऊ देण्याचे आदेश ही प्रशासनाला देण्यात आले आहेत. दरम्यान, लॉकडाउनच्या वेळी ठाणे पोलिसांनी ट्वीटरच्या माध्यामातून नागरिकांचा गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न केला आहे. लॉकडाऊनच्या काळात नागरिकांना अत्यावश्यक सर्व सेवा मिळतील. तसेच आपणांस कोणतीही गैरसोय होत असल्यास नागरिकांनी 100 क्रमांकावर संपर्क साधण्याचा सल्ला दिला आहे.