Lakhimpur Kheri Violence: लखीमपुर खीरी हिंसाचाराच्या निषेधार्थ काँग्रेसचे उद्या राजभवनासमोर मौनव्रत आंदोलन
त्याचबरोबर उद्या काँग्रेस नेते राजभवानासमोर मौनव्रत आंदोलनही करणार आहेत.
लखीमपुर खीरी हिंसाचार (Lakhimpur Kheri Violence) प्रकरणी महाराष्ट्र सरकारने (Maharashtra Government) आक्रमक भूमिका घेतली असून याच्या निर्षेधार्थ उद्या महाराष्ट्र बंदची (Maharashtra Government) हाक दिली आहे. त्याचबरोबर उद्या (सोमवार, 11 ऑक्टोबर) काँग्रेस नेते राजभवानासमोर मौनव्रत आंदोलनही करणार आहेत. दरम्यान, काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी या बंदमध्ये सहभागी होऊन बंद पूर्णपणे यशस्वी करावा, असे आवाहन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी केले आहे
केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्रा यांच्या मुलाने शेतकऱ्यांना गाडीखाली चिरडून त्यांची हत्या केली. उत्तर प्रदेश सरकारने या प्रकरणात अत्यंत बेजबाबदारपणा दाखवला आहे. उत्तर प्रदेशमध्ये कायदा व सुव्यवस्था नसून रामराज्याच्या नावाखाली तालीबानी राजवट सुरु आहे, असे नाना पटोले म्हणाले.
पुढे ते म्हणाले की, या प्रकारानंतर काँग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी शेतकऱ्यांना भेटण्यास जात असताना त्यांना अडवण्यात आले. त्यांना बेकायदेशीररीत्या ताब्यात घेऊन अटक करण्यात आली. छत्तीसगडचे मुख्यमंत्री भुपेश बघेल यांनाही शेतकऱ्यांना भेटण्यास मनाई करण्यात आली. त्याचबरोबर काँग्रेस खासदारला पोलिसांनी धक्काबुक्की केली. याप्रकरणी उत्तर प्रदेशातील भाजप सरकारने लोकशाही व संविधानाचा गळा घोटला आहे. (Maharashtra Bandh: 11 ऑक्टोबर रोजी महाविकास आघाडीची 'महाराष्ट्र बंद'ची हाक; पत्रकार परिषदेत मांडले 'हे' मुद्दे)
भाजप हा शेतकरी विरोधी पक्ष आहे. शेतकऱ्यांवर अन्याय व अत्याचार करणाऱ्या या भाजपा विरुद्ध आवाज बुलंद करण्यासाठी आणि लखीमपुर खीरी प्रकरणातील शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी उद्या महाविकास आघाडी सरकारने बंद पुकारला आहे. त्यामुळे जनतेने आणि व्यापाऱ्यांनी या बंदमध्ये सहभागी होत सहकार्य करावे, असे आवाहन पटोले यांनी केले आहे.