निवडणूक कामांबाबत कामचुकार करणाऱ्या 400 कर्मचाऱ्यांवर गुन्हे दाखल; कठोर कारवाईचे आदेश

आता अशा कर्मचाऱ्यांविरुध्द कठोर कारवाई करण्याचे स्पष्ट आदेश दिले गेले आहेत

निवडणूक प्रशिक्षण | प्रातिनिधिक प्रतिमा (Photo Credit: PTI)

लोकसभा निवडणुका (Lok Sabha Elections) या देशातील सर्वात मोठ्या निवडणुका असल्याने त्यासाठी तितक्याच मोठ्या प्रमाणात मनुष्यबळाची गरज आहे. यासाठी सरकारी कर्मचाऱ्यांना अशा कामात सहभागी करून घेतले जाते. मात्र अनेक कर्मचारी या कामांना टाळाटाळ करतात, प्रशिक्षणाला दांडी मारतात. आता अशा कर्मचाऱ्यांविरुध्द कठोर कारवाई करण्याचे स्पष्ट आदेश दिले गेले आहेत. पुणे जिल्ह्यात 400 जणांवर गुन्हे दाखल करण्याची कार्यवाही जिल्हा प्रशासनाकडून सुरू करण्यात आली आहे. यामध्ये पुणे मतदारसंघातील 300 आणि बारामतीमधील 100 अशा कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.

याआधी श्रीगोंदा येथे प्रशिक्षणाला गैरहजर राहिलेल्या कर्मचार्‍यांवर फौजदारी गुन्हा दाखल करण्याचे आदेश देण्यात आले होते, यामध्ये 87 कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. त्यानंतर नागपूरचे जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनीदेखील अशा कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई होणार असल्याचे सांगितले आहे. लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी रामटेक व नागपूर लोकसभा मतदारसंघातील 4 हजार 382 मतदान केंद्रासाठी 19 हजार 273 अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत.

(हेही वाचा: मतदान पद्धतीत बदल, प्रत्येक मतदारसंघात पाच ठिकाणी होणार व्हीव्हीपॅट स्लिपची पडताळणी; सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय)

पुणे जिल्ह्यात यावर्षी 7 हजार 906 इतकी मतदान केंद्रे झाली आहे, त्यासाठी जवळजवळ 40 हजार कर्मचाऱ्यांची गरज आहे. जिल्हा प्रशासनानेही 40 हजार कर्मचाऱ्यांना निवडणुकीच्या कामाची ऑर्डर काढली आहे. मात्र त्यानंतर अनेकांनी खोट्या सबबी सांगून ड्युटी रद्द करण्याची मागणी केली. तसेच निवडणुकीच्या प्रशिक्षणालाही हजेरी लावली नाही, निवडणुकीच्या इतर कामांना टाळाटाळ केली. प्रशासनाने याची गंभीर दाखल घेत अशांवर थेट गुन्हे दाखल करण्यास सुरुवात केली आहे. इतकेच नाही तर अशा कामचुकार 400 कर्मचाऱ्यांची विभागीय चौकशी करून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी असे आदेशही देण्यात आले आहेत.