Maharashtra: नितीन गडकरी यांच्या पत्रातील आरोपांवर अजित पवार, नाना पटोले, बच्चू कडू यांच्याकडून भाष्य; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या प्रतिक्रियेबाबत उत्सुकता

शिवसेनेच्या दहशतीमुळे राज्यातील रस्त्यांची काम बंद करावी लागतील. असेच जर सुरू राहिले तर महाराष्ट्रात रस्त्यांच्या कामांना नविन मंजुरी देण्याबाबत परत विचार करावा लागेल, असेही त्यांनी पत्रात नमूद केले आहे.

नितीन गडकरी (Photo Credits: PTI)

राज्यात महामार्गाच्या कामात शिवसेना कार्यकर्ते अडथळे आणत आहेत, अशी तक्रार केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना पत्राद्वारे केली आहे. शिवसेनेच्या दहशतीमुळे राज्यातील रस्त्यांची काम बंद करावी लागतील. असेच जर सुरू राहिले तर महाराष्ट्रात रस्त्यांच्या कामांना नविन मंजुरी देण्याबाबत परत विचार करावा लागेल, असेही त्यांनी पत्रात नमूद केले आहे. यावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar), काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) आणि राज्यमंत्री बच्चू कडू (Bachchu Kadu) यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. मात्र, आता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे नितीन गडकरींच्या पत्रावर काय प्रतिक्रिया देतात? याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.

शिवसेना खासदारांच्या विरोधामुळे वाशिम जिल्ह्यातील रस्ते काम गेल्या अनेक महिन्यांपासून रखडले आहे. शिवसेनेच्या दहशतीमुळे राज्यातील रस्त्यांची काम बंद करावी लागतील. विविध प्रकारच्या नियमबाह्य मागण्यांनी अधिकारी आणि कंत्राटदार हैराण आहेत. मागण्या पूर्ण न केल्याने काम बंद पाडण्यापर्यंत मजल गेली आहे. असेच जर सुरू राहिले तर महाराष्ट्रात रस्त्यांच्या कामांना नविन मंजुरी देण्याबाबत परत विचार करावा लागेल, असे नितीन गडकरी यांनी पत्राद्वारे म्हटले आहे. हे देखील वाचा- Covid-19 Third Wave: 'या' महिन्यात येऊ शकते कोविड-19 ची तिसरी लाट; अजित पवार यांचा इशारा

अजित पवार यांची प्रतिक्रिया-

नितीन गडकरी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र पाठवून शिवसैनिक रस्त्याच्या कामात अडथळा आणत असल्याचा आरोप केला आहे. यामध्ये तथ्य आहे की नाही तपासण्याची गरज आहे, असे अजित पवार यांनी म्हटले आहे. यावेळी बोलताना अजित पवार यांनी पदाचा गैरवापर करणाऱ्यांना देखील सुनावले आहे. “जर ठेकेदार चांगल काम करत असेल आणि काही जण राजकिय पक्षाचा आधार घेऊन किंवा मिळालेल्या पदाचा गैरवापर करून जर कोणाला त्रास देत असेल तर तो त्रास ताबडतोब थांबविला गेला पाहिजे”, असेही अजित पवार म्हणाले आहेत.

नाना पटोले यांची प्रतिक्रिया-

देशात निकृष्ट दर्जाचे रस्ते बनवले जात असून महामार्गाच्या कामात भ्रष्टाचार होत आहे. रस्ते प्रकल्पांची किंमत वाढवली जात आहे, त्याचाही विचार होणे आवश्यक आहे. राज्यात चांगल्या दर्जाचे रस्ते झालेच पाहिजे. रस्ते प्रकल्पाचे कामकाज कोणीही अडवणार असेल तर आम्ही त्याचा विरोध करू असे नाना पटोले यांनी म्हटले आहे. तसेच केंद्रीय मंत्री या मुद्द्यावर एखादी श्वेतपत्रिका काढणार का? असाही सवाल नाना पटोले यांनी उपस्थित केला आहे.

बच्चू कडू यांची प्रतिक्रिया-

नितीन गडकरी हे 'विकासपुरूष' असून त्यांनी पत्राद्वारे उपस्थित केलेल्या मुद्यांवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे योग्य कारवाई करतील. याप्रकरणात जबाबदार असलेला शिवसेनेचा नेता, कार्यकर्ता कितीही मोठा असला तरी मुख्यमंत्री कारवाई करतील, असा विश्वास बच्चू कडू यांनी व्यक्त केला आहेत.