चिपळूण शहरात पुराच्या पाण्यातून वाहत आली मगर, नागरिकांची उडाली तारांबळ; वन अधिकाऱ्यांच्या प्रसंगावधानाने टळली मोठी हानी (Video)
प्रसंगावधान राखून वन अधिकाऱ्यांनी ही मगर वेळीच पकडून होणारी हानी टाळली. वशिष्ठी आणि शीव नदीला पुराच्या पाण्यातून वाहत ही मगर शहरात आल्याचे सांगितले जात आहे.
गेल्या आठवड्याभरापासून पावसाचा जोर चांगलाच वाढला आहे. कोकणासह मुंबईला अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. कोकणातील जवळजवळ सर्वच नद्या दुथडी भरून वाहत आहेत. एकीकडे पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाल्याने नागरिकांची तारांबळ उडत आहे, तर दुसरीकडे चिपळूण (Chiplun) शहरात गटारीतून मगर (Crocodile) वाहत आल्याने त्यांची त्रेधा उडाली. प्रसंगावधान राखून वन अधिकाऱ्यांनी ही मगर वेळीच पकडून होणारी हानी टाळली. वशिष्ठी आणि शीव नदीला पुराच्या पाण्यातून वाहत ही मगर शहरात आल्याचे सांगितले जात आहे.
सामनाने या घटनेचा व्हिडीओ शेअर केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, चिपळूण शहरातील दादर मोहल्ला भागातील एका गटारात ही मगर वाहत आली होती. एका नागरिकाने हे पहिले व त्याची माहिती शेजारील लोकांना दिली. पाहता पाहता वाऱ्यासारखी ही बातमी शहरभर पसरली. यामुळे अनेक लोक या परिसरात ही मगर पाहायला जमले होते. त्यानंतर वन विभागाला या गोष्टीची माहिती देण्यात आली. अधिकारी येऊ पर्यंत नागरिक या मगरीवर पाळत ठेऊन होते. त्यानंतर मोठ्या परिश्रमाने अधिकाऱ्यांनी एका लोखंडी पिंजऱ्यात या मगरीला पकडले व तिला बाहेर सोडून दिले. त्यानंतरच नागरिकांनी सुटकेचा निःश्वास टाकला. (हेही वाचा: गुजरात: मंदिरात शिरलेल्या मगरीची भाविकांकडून पूजा, वनाधिकाऱ्यांनी केली सुटका)
सध्या पावसाचे दिवस आहेत. कोकणात अनेक नद्यांना पूर आलेले आहेत त्यामुळे अशा प्रकारची सरपटणारी जनावरे गावांत, शहरात येण्याची शक्यता जास्त असते. अशा वेळी नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.