मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्ष बंद; सरकारकडून मिळणारी मदत थांबल्यामुळे हजारो रुग्णांची गैरसोय
सरकारकडून मिळणारी मदत थांबल्यामुळे राज्यातील गरजू रुग्णांच्या अडचणीत भर पडली आहे.
महाराष्ट्रात (Maharashtra) राष्ट्रपती राजवट लागू झाल्यानंतर मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्ष (Chief Minister's Relief Fund) बंद करण्यात आले आहे. सरकारकडून मिळणारी मदत थांबल्यामुळे राज्यातील गरजू रुग्णांच्या अडचणीत भर पडली आहे. यासाठी राजकीय नेत्यांकडूनही हे कक्ष पुन्हा सुरु करण्यात यावी, अशी मागणी केली जात आहे. यातच राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांनी उडी घेतली आहे. राष्ट्रपती राजवट लागू झाल्यामुळे राज्यातील रुग्णांच्या अडचणी वाढल्या आहेत. यासाठी राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्याकडून रुग्णांना मदत देण्यासाठी निर्देश देण्यात यावे, अशी विनंती धनंजय मुंडे यांनी केली आहे.
राज्यातील गरीब आणि गरजू रुग्णांना वर्षानुवर्षं आर्थिक आधार देण्याचे काम मुख्यमंत्री सहाय्यता निधीच्या माध्यमातून केले जाते. या सहाय्यता निधीसाठी अनेक व्यक्ती आर्थिक हातभार लावत असतात. त्यातून गरजू रुग्णांना मदत पोहोचवली जाते. परंतु, राष्ट्रपती राजवट लागू झाल्यानंतर गरजू रुग्णांच्या अडचणीत भर पडली आहे. रुग्णांना हवी ती मदत मिळत नसल्यामुळे राज्यपालांनी यावर तोडगा काडावा असे आवाहन धनंजय मुंडे यांनी केले आहे. "राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झाल्याने मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी कक्ष बंद करण्यात आला आहे. त्यामुळे राज्यातील हजारो रुग्णांना शासनाकडून मिळणारी वैद्यकीय मदत बंद झाली आहे. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी याबाबत दखल घेत रुग्णांना मदत देण्याबाबत निर्देश द्यावेत ही विनंती" असे धनंजय मुंडे ट्विटरच्या माध्यमातून म्हणाले आहेत. हे देखील वाचा- देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा घेतली राज्यपाल भगत सिंग कोश्यारी यांची भेट
महाराष्ट्र राज्यातील तसेच देशातील आपत्तीग्रस्तांना तातडीने सहाय्यता देणे, हे मुख्यमंत्री सहाय्यता निधीचे उद्दिष्ट आहे. पूर, दुष्काळ, आगीमुळे होणारे अपघात अशा मोठ्या नैसर्गिक आपत्तींमुळे बाधीत नागरिकांना मुख्यमंत्री सहाय्यता निधी मार्फत अर्थसहाय्य पुरविले जाते. समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना दुर्धर आजारांवर उपचार करण्यासाठीही या निधीतून अर्थसहाय्य पुरविले जाते.