Coronavrius: राज्यात आयसीयू बेड्सची सुविधा उपलब्ध व्हावी यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची रेल्वे, मुंबई पोर्ट ट्रस्ट, भारतीय लष्कराकडे विनंती
या पार्श्वभूमीवर नियोजनाचा भाग म्हणून अधिकाधिक आयसीयू बेड्स उपलब्ध होण्यासाठी रेल्वे, मुंबई पोर्ट ट्रस्ट, भारतीय लष्कर आणि इतर केंद्र शासनाच्या अखत्यारितील रुग्णालये व संस्थांना त्यांच्या राज्यभरातील सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे.
Coronavrius: राज्यात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. या पार्श्वभूमीवर नियोजनाचा भाग म्हणून अधिकाधिक आयसीयू बेड्स उपलब्ध होण्यासाठी रेल्वे, मुंबई पोर्ट ट्रस्ट, भारतीय लष्कर आणि इतर केंद्र शासनाच्या अखत्यारितील रुग्णालये व संस्थांना त्यांच्या राज्यभरातील सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray) यांनी केली आहे.
गेल्या तीन महिन्यांपासून राज्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी राज्य सरकार प्रयत्न करत आहे. सरकारने विविध उपाययोजनांच्या माध्यमातून कोरोनाच्या साथीला अद्यापपर्यंत नियंत्रणात ठेवले आहे. राज्यात कोरोना चाचण्यांचा वेग वाढला आहे. तसेच रुग्ण बरे होऊन घरी जाण्याचे प्रमाणही वाढले आहे, असं मत उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केलं आहे. या महिन्यात कोरोना रुग्णाचा आकडा वाढला आहे. राज्य शासनाकडून मुंबई, पुण्यासह प्रमुख शहरांमध्ये आयसोलेशन आणि आयसीयू बेड्स मोठ्या प्रमाणावर उपलब्ध होतील याचे नियोजन करण्यात येईल, असंही ठाकरे यांनी सांगितलं आहे. (हेही वाचा - राज्यातील विविध जिल्ह्यांत अडकलेल्या लोकांना त्यांच्या गावी सोडण्यासाठी शासनाकडून 10 हजार एसटी बसेसमार्फत मोफत सेवा पुरवण्यात येणार - विजय वडेट्टीवार)
दरम्यान, मुंबईत महालक्ष्मी रेसकोर्स, नेहरू सायन्स सेंटर, नेहरू तारांगण, गोरेगाव एक्झिबिशन सेंटर, जेजे रूग्णालयाजवळील रिचर्डसन कृडास फॅक्टरीची जागा, बांद्रा कुर्ला संकूल आदी ठिकाणी आयसोलेशन आणि आयसीयू बेड्सची सुविधा केली आहे. राज्यात इतरत्रही मोठ्या शहरांमध्ये पालिका आयुक्त व जिल्हाधिकाऱ्यांच्या पातळीवर ही सुविधा उपलब्ध करणे सुरू आहे. तसेच राज्यात खासगी रुग्णालये व मोठ्या संस्थांच्या जागाही आयसीयू बेड्ससाठी उपलब्ध होत आहेत, असंही उद्धव ठाकरे यांनी सांगितलं आहे.
सरकारने लॉकडाऊन शिथिल केल्यानंतर आता राज्याराज्यातून महाराष्ट्रातले नागरिक यायला सुरुवात झाली आहे. परदेशातूनही नागरिक परतायला सुरुवात होणार आहे. त्यामुळे रुग्णसंख्या अधिक वाढल्यास जास्त आयसीयू बेड्सची गरज भासणार आहे. तसेच इतर वैद्यकीय सुविधाही लागतील हे गृहीत धरून शासनाचे नियोजन सुरु असल्याचंही ठाकरे यांनी स्पष्ट केलं आहे.