Maharashtra Floor Test: महाविकास आघाडीचा विश्वासदर्शक ठराव मंजूर; ठाकरे सरकारने सिद्ध केले बहुमत, तब्बल 169 आमदारांचा पाठींबा

ठाकरे सरकारने आपले बहुमत सिद्ध केल्याने, अध्यक्षांनी एकमताने हा विश्वास दर्शक ठराव मंजूर केला आहे.

Maharashtra CM Uddhav Thackeray | (Photo Credits: PTI)

अखेर महाराष्ट्रात नव्याने स्थापन झालेल्या महाविकास आघाडीने (MahavikasAghadi) बहुमत चाचणीमध्ये यश प्राप्त केले आहे. ठाकरे सरकारने आपले बहुमत सिद्ध केल्याने, अध्यक्षांनी एकमताने हा विश्वास दर्शक ठराव मंजूर केला आहे. नव्या सरकारसाठी ही खचितच आनंदाची बाब आहे. मात्र याला गालबोट लागले ते विरोधी पक्षाने निर्माण केलेल्या मुद्द्याने.  माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी हे अधिवेशन संविधानाच्या नियमाला धरून नाही असे म्हणत यावर बेकायदेशीर असा ठपका लावला व मध्येच सभागृहाचा त्याग केला.

ठाकरे सरकार आज विश्वास दर्शक ठराव घेणार असल्याची घोषणा काल करण्यात आली होती. त्यानुसार आज दुपारी 2 वाजता विधानसभेत फ्लोअर टेस्टला सुरुवात झाली. मात्र सुरुवातीलाच, 'अधिवेशन बोलावण्यासाठी राज्यपालांचा समन्स काढावा लागणे गरजेचे असते, मात्र तसे झाले नाही. यामुळे हे अधिवेशन बेकायदेशीर आहे' असा आरोप माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला. याबाबत हंगामी अध्यक्ष दिलीप वळसे-पाटील यांनी हे अधिवेशन राज्यपालांच्या परवानगीनेच होत आहे असे सांगत फडणवीस यांचा मुद्दा फेटाळून लावला. (हेही वाचा: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या बहुमत चाचणीत गदारोळ; हे अधिवेशन बेकायदेशीर असल्याचा, देवेंद्र फडणवीस यांचा आरोप)

त्यानंतरही देवेंद्र फडणवीस यांनी आपला मुद्दा लावून धरला. शेवटी आपली बाजू कमकुवत आहे हे लक्षात येताच भाजपने आजच्या अधिवेशनावर बहिष्कार टाकत सभात्याग केला. त्यानंतर सभागृहाचे दरवाजे बंद करण्यात आले व बहुमत चाचणीला सुरुवात झाली. त्यानंतर चाललेल्या मोजणीमध्ये तब्बल 169 उमेदवारांची मते महाविकास आघाडीला मिळाली व नव्या सरकारने यशस्वीरीत्या बहुमत चाचणी पार पाडली. यावेळी चार आमदारांनी तठस्थ अशी भूमिका घेतली. त्यानंतर आपली मते व्यक्त करताना महाविकास आघाडीच्या नेत्यांनी भाजपच्या भूमिकेवर कडाडून टीका केली.