President Election 2022: राष्ट्रपती निवडणुकीत 'द्रौपदी मुर्मू' यांना राज्यातुन 200 मते मिळणार, मुख्यमंत्री शिंदेंचा दावा?

त्यामुळे एकनाथ शिंदे काँग्रेस किंवा राष्ट्रवादीच्या आमदारांच्या विश्वासाच्या जोरावर मते फोडण्यासाठी हा दावा करत आहेत का? हा एक मोठा प्रश्न निर्माण होत आहे.

CM Eknath Shinde And Draupadi Murmu (Photo Credit - Twitter)

राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी (President Election 2022) उद्या (18 जुलै, सोमवार) मतदान होणार आहे. द्रौपदी मुर्मू (Draupadi Murmu) एनडीएकडून राष्ट्रपतीपदाच्या उमेदवार आहेत. यशवंत सिन्हा (Yashwant Sinha) यांना यूपीएचे उमेदवार बनवण्यात आले आहे. एनडीएच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना महाराष्ट्रातून 200 मते मिळतील, असा निर्धार मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी (CM Eknath Shinde) केला असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. पण भाजप आणि शिंदे गटाच्या आमदारांनी त्यांच्या समर्थकांसह छोट्या पक्षांची आणि अपक्ष आमदारांची मते जोडली तर त्यांना दोनशे मते मिळतात का? नाही तर सीएम शिंदेंच्या या दाव्याचा आधार काय? सर्व आकडेमोड लक्षात घेता भाजप, शिंदे गट आणि त्यांच्या समर्थक आमदारांच्या मतांसह उद्धव ठाकरेंच्या छावणीतील आमदारांची मते जोडून हा आकडा 185 वर पोहोचतो. त्यामुळे एकनाथ शिंदे काँग्रेस किंवा राष्ट्रवादीच्या आमदारांच्या विश्वासाच्या जोरावर मते फोडण्यासाठी हा दावा करत आहेत का? हा एक मोठा प्रश्न निर्माण होत आहे.

भाजप आणि शिंदे गट आणि त्यांच्या समर्थकांची एकूण मते 170 आहेत. उद्धव ठाकरे यांना पाठिंबा देणाऱ्या 15 आमदारांची मते जोडली तर हा आकडा 185 वर पोहोचतो. अशा स्थितीत 200 मतांपेक्षा 15 मते कमी पडत आहेत. विधान परिषदेच्या निवडणुकीत काँग्रेसच्या उमेदवाराला 8 मते कमी पडली होती. हाच खेळ इथे झाला तरी 200 चा आकडा गाठण्यासाठी आणखी आठ-नऊ मते लागतील. अशा स्थितीत काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे आमदार फोडूनच ही मते आणता येतील का? असा प्रश्न उभा होत आहे.

राज्यातुन द्रौपदी मुर्मूच्या समर्थनार्थ 200 मते मिळणार?

सध्या काँग्रेसचे 44 आणि राष्ट्रवादीचे 53 आमदार आहेत. राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत कोणत्याही पक्षाचा व्हिप लागू होत नाही. राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत गुप्त मतदान होते. अशा स्थितीत राज्यसभा आणि विधानपरिषद निवडणुकीत ज्याप्रमाणे भाजपला इतर पक्षांच्या आमदारांचा पाठिंबा मिळवण्यात यश आले, त्याचप्रमाणे यावेळीही शिंदे गट आणि भाजपने मिळून यश मिळवले, असा प्रश्न उपस्थित होत आहे. (हे देखील वाचा: राजभवनातील एकनाथ शिंदे-देवेंद्र फडणवीस यांच्या फोटो सह Sanjay Raut यांचं 'Wait and Watch' म्हणत ट्वीट)

उद्धव ठाकरेंकडून द्रौपद मुर्मू यांना पाठिंबा जाहीर 

राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत एनडीएचा उमेदवार विजयी झाल्यास देशात प्रथमच राष्ट्रपतीपदावर आदिवासी किंवा अनुसूचित जमातीचा उमेदवार बसणार आहे. ही देशासाठी अभिमानाची बाब असल्याचे सांगत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी यूपीएमध्ये असतानाही एनडीएच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा जाहीर केला आहे. त्याचप्रमाणे, बहुजन वंचित आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनीही ट्विट करून यूपीएचे उमेदवार यशवंत सिन्हा यांना शर्यतीतून माघार घेण्याचा सल्ला दिला आहे कारण सर्व पक्षांच्या अनेक सदस्यांनी द्रौपदी मुर्मूच्या बाजूने मतदान करण्याची तयारी दर्शवली आहे.