नितेश राणे यांच्यावर 'खुनाचा प्रयत्न' हे कलम लावण्याचे चंद्रकांत पाटील यांचे आदेश; नारायण राणे मुलाला वाचवण्यात अपयशी
या व्हिडीओमुळे राजकीय क्षेत्रात मोठी खळबळ माजली आहे
कॉंग्रेस आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी रस्त्याच्या निकृष्ट दर्जाबाबत एका अधिकाऱ्याला चिखलाने अंघोळ घालण्याचे धक्कादायक कृत्य केले होते. राणे यांना हे कृत्य चांगलेच महागात पडले आहे. कारण न्यायालयाने त्यांना 9 जुलै पर्यंत पोलीस कोठडी बजावली आहे. याबाबत पुण्याचे पालकमंत्री आणि महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये त्यांनी नितेश राणे यांच्यावर ‘खुनाचा प्रयत्न’ हे कलम लावण्याचे आदेश दिले असल्याचे नमूद केले आहे. या व्हिडीओमुळे राजकीय क्षेत्रात मोठी खळबळ माजली आहे.
नुकतेच महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी उप अभियंता प्रकाश शेडेकर यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली. यावेळी बोलताना ते म्हणाले, ‘नितेश राणे यांचे वडील खासदार नारायण राणे यांचा मला फोन आला होता. दादा, माझ्या मुलाला वाचवा, असे राणे म्हणाले. परंतु मी त्यांना नकार दिला. उलट आता मी नितेश राणे यांच्यावर ‘खुनाचा प्रयत्न’ हे कलम लावण्याचे आदेश दिले आहेत.’ सामनाने याबाबत वृत्त दिले आहे.
चंद्रकांत पाटील यांच्या या भेटीनंतर हे प्रकरण अजूनच चिघळणार हे स्पष्ट होत आहे. शेडेकर यांच्या कुटुंबियांची भेट घेण्यापूर्वी कणकवली येथील रस्त्याची पाहणी करा असे कार्यकर्त्यांनी पाटील यांना सांगितले होते. मात्र आता चंद्रकांत पाटील यांच्या या वक्त्यव्यानंतर राणे समर्थक अजूनच चिडले आहेत. (हेही वाचा: नितेश राणे यांच्यावर 'खुनाचा प्रयत्न' हे कलम लावण्याचे चंद्रकांत पाटील यांचे आदेश)
दरम्यान, मुंबई – गोवा महामार्गाचे चौपदरीकरणाचे काम चालू असल्याने ट्राफिक वाढले आहे. त्यात निर्माण झालेले खड्डे बुजवण्यात प्रशासन टाळाटाळ करत आहे. याच मुद्द्यावर कॉंग्रेसचे आमदार नितेश राणे आक्रमक झाले होते. त्यांनी याबाबत थेट आंदोलन करत, हायवे प्रकल्पाचे उप-अभियंता प्रकाश शेडेकर यांना चक्क चिखलाने अंघोळ घातली. यावेळी अभियंत्याला शिवीगाळ करत त्याला बांधून ठेवण्यात आले होते.