मध्य रेल्वे मार्गावर 30 जानेवारीला होणार पहिल्या एसी लोकलचा शुभारंभ, महिला मोटर वूमन स्विकारणार सारथ्य
तर काही वेळेस गर्दीमुळे मध्य रेल्वे मार्गावर राहणाऱ्या प्रवाशांना लोकल पकडणे कठीण होऊन बसते.
मुंबईत मध्य रेल्वे मार्गावर प्रवाशांची गर्दी अधिक आणि लोकलचा विलंब यामुळे नेहमीच संताप व्यक्त केला जातो. तर काही वेळेस गर्दीमुळे मध्य रेल्वे मार्गावर राहणाऱ्या प्रवाशांना लोकल पकडणे कठीण होऊन बसते. मात्र आता उद्यापासून मध्य रेल्वे मार्गावर पहिल्या एसी लोकलचा शुभारंभ रेल्वेमंत्री सुरेश अंगडी यांच्या हस्ते होणार आहे. सीएसएमटी स्थानकातून सुटल्यानंतर ठाणे येथे पोहचल्यावर शिवसेना नेते एकनाथ शिंदे आणि खासदार राजन विचारे यांच्या हस्ते या एसी लोकला हिरवा कंदील दाखवला जाणार आहे.
एसी लोकलचे खास महत्व म्हणजे याचे सारथ्य महिला मोटर वूमन मनीषा मस्के करणार आहेत. यामुळे मस्के या भारतामधील एसी लोकल चालवणाऱ्या पहिल्या महिला ठरणार आहेत. या एसी लोकलमध्ये महिलांच्या डब्यात सीसीटिव्ही कॅमेरे लावण्यात येणार आहेत. त्यामुळे महिलांच्या सुरक्षेवर नेहमीच लक्ष राहणार आहे. एसी लोकलचे वैशिष्ट म्हणजे याचे दरवाजे ऑटोमेटिकली लॉक-अनलॉक होणार आहेत. ही लोकल पनवेल ते ठाणे आणि पनवेल ते वाशी दरम्यान धावणार असून एकूण 16 फेऱ्या दिवसभरात होणार आहेत. तर सामान्य लोकलच्या 15 फेऱ्या कमी करण्यात आल्या आहेत. या एसी लोकलची महत्वाची बाब म्हणजे ही पश्चिम रेल्वे वर सध्या कार्यरत असणाऱ्या लोकलशी मिळती जुळती आहे. मात्र या लोकलची उंची काही इंचाने कमी करण्यात आली आहे. ट्रान्सहार्बर मार्गावर अनेक ठिकाणी ब्रिटिशकालीन पूल असल्याने उंचीच्या बाबत हा निर्णय घेण्यात आला आहे.(ठाणे- वाशी/ पनवेल एसी लोकल 30 जानेवारी पासून प्रवाशांच्या सेवेत होणार रुजू)
एसी लोकलचे तिकीट ठाणे-वाशी मार्गासाठी सुमारे 130 रुपये आणि ठाणे-पनवेल मार्गासाठी सुमारे 175 रुपये असेल, 30 जानेवारीला ठाणे ते पनवेल अशी उदघाटनाची लोकल चावलण्यात येईल आणि 31 जानेवारी पासून या लोकलच्या नियमित फेऱ्या सुरु होणार आहेत.