BMC's Financial Deals: बीएमसीने गेल्या 25 वर्षांत केलेल्या खर्चाचे होणार ऑडिट; मंत्री Uday Samant यांची माहिती
यासाठी त्रिसदस्यीय समिती स्थापन करण्यात येणार असून ती या प्रकरणाची चौकशी करणार आहे.
कोविड-19 (Covid-19) महामारीच्या काळात बीएमसीच्या (BMC) वादग्रस्त खर्चाबाबतचे प्रकरण अद्याप चर्चेत असताना, महाराष्ट्र सरकारने आता भारतातील सर्वात श्रीमंत नागरी संस्थेने म्हणजेच बीएमसीने गेल्या 25 वर्षांत केलेल्या खर्चाचे ऑडिट करण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबई महापालिकेच्या गेल्या 25 वर्षांतील कामांची श्वेतपत्रिका काढण्याचा निर्णय सरकारने घेतला असल्याची माहिती उद्योगमंत्री उदय सामंत यांनी मंगळवारी दिली. यातून शिवसेनेच्या (उद्धव ठाकरे) कार्यकाळात झालेले घोटाळे उघड होतील, असे सामंत म्हणाले. मंगळवारी पत्रकारांशी बोलताना सामंत म्हणाले की, विधानसभेच्या (चालू) अधिवेशनात बीएमसीच्या कामकाजावर प्रश्न उपस्थित करण्यात आला होता. गेल्या 25 वर्षात महापालिकेच्या कारभारावर आमदारांनी संशय व्यक्त केला आहे.
शिंदे सरकारने घेतलेल्या या निर्णयामुळे ठाकरे गटाची अडचण होऊ शकते. राज्य सरकारच्या या निर्णयानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सरकारवर निशाणा साधत सरकारमध्ये हिंमत असेल तर राज्यातील इतर महापालिकांचीही चौकशी करावी, असे सांगितले.
उदय सामंत म्हणाले की, कोरोनाच्या काळात मुंबई महापालिकेत ज्या प्रकारे लुटीचा खेळ खेळला गेला, ते पाहता शासनाने ऑडिट करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी त्रिसदस्यीय समिती स्थापन करण्यात येणार असून ती या प्रकरणाची चौकशी करणार आहे. या समितीमध्ये नियोजन विभागाचे अतिरिक्त प्रधान सचिव, नगरविकास प्रधान सचिव आणि संचालक (वित्त-लेखापरीक्षण) या अधिकाऱ्यांचा समावेश असेल. पुढील अर्थसंकल्पीय अधिवेशनात स्थापन करण्यात आलेल्या समितीच्या अहवालावर सभागृहात चर्चा होणार असल्याचे सामंत यांनी सांगितले. (हेही वाचा: राज्य सरकारने स्वीकारला State Backword Commision आयोगाचे अध्यक्ष निवृत्त न्या. आनंद निरगुडे यांचा राजीनामा)
राज्य सरकारने केलेल्या या घोषणेनंतर विरोधक आक्रमक झाले आहेत. याबाबत उद्धव ठाकरे म्हणाले की, सरकारने मुंबई महापालिकेच्या कामकाजाचे ऑडिट करण्याचा निर्णय घेतला आहे. माझे सरकारला आव्हान आहे की, त्यांनी ज्याप्रमाणे मुंबई महानगरपालिकेचे ऑडिट करण्याची भाषा केली आहे, त्याचप्रमाणे ज्या महापालिकांमध्ये भाजपची सत्ता आहे त्यांचेही ऑडिट व्हायला हवे.
पीएम केअर फंडात किती पैसा आला आणि कुठे गेला याचीही चौकशी व्हायला हवी, असेही ठाकरे म्हणाले. गेल्या दीड वर्षाच्या कार्यकाळात भाजप आणि शिंदे गटाने मनमानी पद्धतीने जनतेच्या पैशांची लूट केली, याचीही चौकशी व्हायला हवी. भाजप आमदार अतुल भातखळकर म्हणाले की, मुंबई महापालिकेत गेल्या 25 वर्षात एकही घोटाळा झाला नाही, असे उद्धव ठाकरे गटाला वाटत असेल, तर त्यांनी घाबरू नये. त्यांनी राज्य सरकारने उचललेल्या या पाऊलाचे कौतुक करायला हवे.