BMC Budget 2024: मुंबई महानगर पालिकेचा आज सादर होणार अर्थसंकल्प; सलग दुसर्‍या वर्षी प्रशासक Iqbal Singh Chahal कडून बजेट

मुंबई महापालिकेची निवडणूक अद्याप झाली नसल्याने सलग दुसर्‍या वर्षी आज प्रशासकच अर्थसंकल्प सादर करणार आहेत.

BMC (File Image)

मुंबई महानगरपालिकेचा (BMC) आज अर्थसंकल्प (Budget) मांडला जाणार आहे. बीएमची चा कारभार सध्या प्रशासकाच्या हातामध्ये असल्याने यंदाही इक्बाल सिंह चहल (Iqbal Singh Chahal)  यांच्याकडून बीएमसीचा अर्थसंकल्प सादर केला जाईल. मागील वर्षी बीएमसीचं बजेट 52,619.07 कोटी रुपयांचे होते, जे 2022-23 आर्थिक वर्षाच्या तुलनेत 14.52 टक्क्यांनी वाढले होते. त्यामुळे यंदा आगामी निवडणूकीचा काळ पाहता बीएमसीच्या अर्थसंकल्पामध्ये कोणत्या मोठ्या घोषणा होणार याकडे मुंबईकरांचे लक्ष लागले आहे. बीएमसी ही आशियातील सर्वात श्रीमंत महानगरपालिका आहे.

मुंबई मध्ये रस्त्यांचे कॉंक्रेटीकरणाचे काम मोठ्या प्रमाणात सुरू आहे. तसेच सुशोभिकरण आणि स्वच्छतेकडेही लक्ष दिले जात आहे. मुंबई मध्ये प्रदुषणाची वाढती पातळी चिंतेचा विषय ठरला आहे. त्यामुळे मुंबईतील प्रदुषणाला रोखण्यासाठी काय केले जाईल यासाठी या बजेट मध्ये विशेष तरतूद होणार का? हे पहावं लागणार आहे. मुंबईच्या कोस्टल रोड कडे लोकांचे लक्ष आहे. या बजेट मध्ये बेस्ट बाबत काय निर्णय होणार, मुंबई वरची करवाढ होणार की नाही? हे पहावं लागणार आहे. नक्की वाचा: Mumbai: मुंबईकरांनो सावध! आता फूटपाथ आणि रस्त्यांवर कबुतरांना खायला घालणाऱ्यांवर होणार कारवाई; BMC चा मोठा निर्णय .

दरम्यान मुंबई महानगरपालिकेतील नगरसेवकांची मुदत 7 मार्च 2022 रोजी संपली होती. त्यानंतर गेल्या दीड वर्षांपासून बीएमसीचा कारभार आयुक्त आणि प्रशासक इक्बाल सिंह चहल यांच्या हातात आहे. मुंबई महापालिकेची निवडणूक अद्याप झाली नसल्याने सलग दुसर्‍या वर्षी आज प्रशासकच अर्थसंकल्प सादर करणार आहेत.