Mumbai: मुंबईकरांनो सावध! आता फूटपाथ आणि रस्त्यांवर कबुतरांना खायला घालणाऱ्यांवर होणार कारवाई; BMC चा मोठा निर्णय
Brihanmumbai Municipal Corporation (Photo credit: File Photo)

राज्याची राजधानी मुंबई (Mumbai) शहर स्वच्छ, सुंदर, प्रदूषणरहित आणि आरोग्यदायी बनवण्यासाठी बीएमसीने विविध प्रयत्न केले आहेत. कबुतर (Pigeons) हे श्वसनाचे आजार आणि समाजात अस्वच्छता पसरवणारे समजले जात असल्याने कबुतरांना दाणे चारणाऱ्या लोकांवर कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे. आता, नियुक्त केलेल्या ठिकाणांव्यतिरिक्त रस्ते आणि पदपथांवर बेकायदेशीरपणे कबुतरे चारणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. बीएमसी ही जबाबदारी मार्शल्सना सोपवत आहे, जे कबुतरांना दाणे घालणाऱ्या लोकांवर 100 ते 500 रुपयांपर्यंत दंड आकारू शकतात. एका बीएमसी अधिकाऱ्याने याबाबत माहिती दिली.

मुंबईतील वायू प्रदूषणाचा मुकाबला करण्यासाठी, बीएमसीने शहरातील धुळीचा निपटारा करण्यासाठी सत्तावीस उपाय लागू केले आहेत. हे नियम प्रभाग स्तरावर लागू केले जातात. बीएमसी आता बेकायदेशीरपणे कबुतरांना खाद्य देणाऱ्यांना लक्ष्य करत आहे. महालक्ष्मी, दादर, माहीम आणि सीएसएमटी भागात समर्पित 'कबुतर खाना' असताना, अनेक लोक फूटपाथ, रस्ते आणि मोकळ्या जागेवर पक्षांना खाणे देत असल्याचे निदर्शनास आले आहे, ज्यामुळे नागरिकांच्या तक्रारी आहेत. त्यांच्यामते यामुळे परिसरात कबुतरांचा मोठा थवा जमा होतो व त्यामुळे उपद्रव निर्माण होतो.

बीएमसी अधिकारी सांगतात, ‘कबूतरांच्या विष्ठेमुळे आजार पसरतात आणि त्यांच्या पिसांतील कणांमुळे दमा आणि फुफ्फुसाचे आजार यांसारखे श्वसनाचे आजार होऊ शकतात.’ वैद्यकीय सल्लागारांनी मानवी वसाहतींपासून दूर कबूतर खाणे प्रस्थापित करण्याची सूचना केली आहे.

(हेही वाचा: BMC's Financial Deals: बीएमसीने गेल्या 25 वर्षांत केलेल्या खर्चाचे होणार ऑडिट; मंत्री Uday Samant यांची माहिती)

मुंबईला राहण्यायोग्य बनवण्यासाठी करोडो रुपये खर्च केले जात आहेत. स्वच्छतेच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या मुंबईकरांवर कारवाई करण्यासाठी बीएमसीने नुकतेच मार्शल नेमण्याचा निर्णय घेतला आहे. वायू प्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्या संस्था आणि कंत्राटदारांवरही मार्शल देखरेख ठेवतील आणि त्यांच्यावर कारवाई करतील.