Shirdi Sai Baba Temple: शिर्डी साई संस्थानचा मोठा निर्णय! 'या' अटींचे पालन न करणाऱ्या भाविकांना मंदिरात प्रवेश नाही
राज्यातील विविध शहरात गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे. ज्यामुळे राज्यात कडक निर्बंध करण्यात येत आहेत.
महाराष्ट्रात (Maharashtra) पुन्हा एकदा कोरोनाचे (Coronavirus) जाळे वेगाने पसरत चालले आहे. राज्यातील विविध शहरात गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे. ज्यामुळे राज्यात कडक निर्बंध करण्यात येत आहेत. एवढेच नव्हेतर, राज्यात गेल्या अनेक महिन्यानंतर उघडण्यात आलेली मंदीरे पुन्हा एकदा बंद करण्यास सुरुवात झाली आहे. मात्र, शिर्डीचे साईमंदीर (Shirdi Sai Baba Temple) खुलेच ठेवण्याचा निर्णय संस्थानने घेतला आहे. परंतु, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर साई संस्थानने दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसाठी काही अटी तयार केल्या आहेत. या अटींचे पालन न करणाऱ्या भाविकांना मंदिरात प्रवेश दिली जाणार नाही.
महाराष्ट्रात लॉकडाऊन लागल्यानंतर गेल्या तीन महिन्यांपूर्वी अनेक अटी व नियमांसह साई मंदीर उघडण्यात आले होते. परंतु, राज्यात कोरोनाचे संकट गडद होण्याची शक्यता आहे. यामुळे मंदीर पुन्हा बंद करण्याची वेळ येऊ नये म्हणून साई संस्थानकडून कठोर पावले उचलली जात आहेत. नव्या अटीनुसार, एका दिवसात केवळ 15 हजार भाविकांना दर्शन घेता येणार आहे. त्याआधी भाविकांना ऑनलाईन दर्शनपास घ्यावा लागणार आहे. पास असल्याशिवाय मंदिरात प्रवेश दिला जाणार नाही. हे देखील वाचा- Coronavirus In Mumbai: मुंबईतील कोविड 19 विरूद्धच्या लढाईत महापौर किशोरी पेडणेकर रस्त्यावर; दादरच्या भाजी मंडईत मास्क वाटप
तसेच मास्कचा वापर न करण्याऱ्या साईभक्तांना मंदिरात प्रवेश मिळणार नाही. याशिवाय, जेष्ठ नागरिकांसह दहा वर्षाखालील मुलांनाही प्रवेश दिला जाणार नाही. मंदिरात पुजेचे साहित्य नेण्यास सक्त मनाई आहे. सर्व साईभक्तांनी आपली होणारी गैरसोय टाळण्याकरीता ऑनलाईन दर्शनपास उपलब्ध करुन निर्धारीत वेळेत दर्शनासाठी शिर्डीत यावे. महत्वाचे म्हणजे, जे साईभक्त आजारी आहेत अशा साईभक्तांनी दर्शनाकरीता येऊ नये, असे आवाहन करण्यात आले आहे.
महाराष्ट्रात सोमवारी (22 फेब्रुवारी) 5 हजार 210 कोरोनाबाधीत रुग्णांची वाढ झाली आहे. तर, आज नवीन 5 हजार 035 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. एकूण 19 लाख 99 हजार 982 रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत. राज्यात एकूण 53 हजार 113 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 94.96% झाले आहे, अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.