Barsu Refinery Project: रत्नागिरीतील बारसू येथे होणार मेगा ऑईल रिफायनरी प्रकल्प; 5 लाख रोजगार निर्मितीची शक्यता
या प्रकल्पासाठी स्थानिक धरणांऐवजी कोयना धरणातील पाणी वापरणार असल्याचं उद्योगमंत्र्यांनी सांगितले.
मागच्या काही आठवड्यांमध्ये महाराष्ट्रातील काही प्रकल्प राज्याबाहेर गेल्याने मोठा गदारोळ माजला होता. यामुळे विरोधी पक्ष नेत्यांनी सध्याच्या सरकारवर कडाडून टीकाही केली होती. आता एक मोठा प्रकल्प महाराष्ट्रात होऊ घातला आहे. मेगा रिफायनरी (Mega Refinery Project) रत्नागिरी जिल्ह्यातील बारसू येथे होणार आहे. याबाबत महाराष्ट्र उद्योग उदय सामंत म्हणाले की, या प्रकल्पासाठी एकूण 6,200 एकर जमिनीची आवश्यकता असून, त्यापैकी 2,900 एकर जमीन संपादित करण्यात आली आहे.
रत्नागिरीतील शिवसेना आणि ग्रामस्थांच्या विरोधामुळे मार्च 2019 मध्ये रद्द करण्यात आलेल्या वादग्रस्त प्रकल्पाचे पुनरुज्जीवन करण्याचे संकेत शिंदे-फडणवीस सरकारने यापूर्वी दिले होते. ही ऑइल रिफायनरी आशियातील सर्वात मोठी असेल आणि ती रत्नागिरीतील नाणार गावात उभारली जाणार होती. हे इंडियन ऑइल कॉर्पोरेशन (IOC), भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (BPCL), हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (HPCL) आणि सौदी अरेबियातील आरामको यांच्यातील संयुक्त उपक्रम आहे.
नाणार येथे होणारा हा मेगा रिफायनरी प्रकल्प आता रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यातच बारसू येथे व्हावा, असे पत्र तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पत्र दिले होते. वेदांत फॉक्सकॉन गमावल्यानंतर सामंत यांनी दावा केला होता की, रत्नागिरी जिल्ह्यातील बारसू येथे 3 लाख कोटी रुपयांचा मेगा रिफायनरी प्रकल्प महाराष्ट्रात येईल. मेगा रिफायनरी प्रकल्प राज्याबाहेर जाणार नाही, असा दावा उद्योगमंत्र्यांनी केला होता. स्थानिक आमदार त्यांच्या मर्जीतील असताना त्यांच्या विरोधात चुकीची माहिती देणारी मोहीम चालवली जात असल्याचे सामंत म्हणाले होते. (हेही वाचा: Belgaum Border Dispute: अखेर बेळगाव सिमा प्रश्नाच्या वादावर तोडगा निघणार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेची महत्वपूर्ण घोषणा)
या प्रकल्पातून विविध टप्प्यांवर 5 लाख रोजगार निर्मिती होणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. या प्रकल्पासाठी स्थानिक धरणांऐवजी कोयना धरणातील पाणी वापरणार असल्याचं उद्योगमंत्र्यांनी सांगितले. यासाठी एकूण 6,200 एकर जागा या प्रकल्पासाठी मिळवायची आहेत, त्यापैकी 2900 एकर जागेसाठी तिथल्या जमीन मालकांनी संपत्तीपत्रे दिलेली आहेत.