Bandra Terminus Stampede: आता प्लॅटफॉर्मवर मोठ्या आकाराच्या वस्तूंवर बंदी, ट्रेनमधील सामानावर वजनाची मर्यादा; वांद्रे टर्मिनस चेंगराचेंगरीनंतर पश्चिम रेल्वेचा मोठा निर्णय

वांद्रे टर्मिनस येथे नुकत्याच झालेल्या चेंगराचेंगरीनंतर, पश्चिम रेल्वेने स्टेशन परिसर आणि प्लॅटफॉर्मवर ड्रम आणि इतर तत्सम वस्तू तसेच मोठ्या आकाराच्या वस्तूंवरही बंदी घालण्यात आली आहे.

Indian Railway | Photo Credits: commons.wikimedia

वांद्रे टर्मिनसवर झालेल्या चेंगराचेंगरीनंतर (Bandra Terminus Stampede) पश्चिम रेल्वेने (Western Railway) सर्व प्रवाशांना मार्गदर्शक तत्वे जारी केली असून, प्रत्येक वर्गाच्या प्रवासासाठी निर्धारित मोफत सामान भत्ता मर्यादेचे पालन करण्याचे आवाहन केले आहे. पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी विनीत अभिषेक यांच्या म्हणण्यानुसार, प्रत्येक प्रवाशाला त्यांच्या प्रवासाच्या डब्यात विशिष्ट प्रमाणातच सामान मोफत घेऊन जाण्याचा अधिकार आहे, अहवालानुसार, एसी फर्स्ट क्लासमध्ये प्रवाशांना 70 किलोपर्यंत मोफत सामानाची परवानगी आहे, तर एसी 2-टियर आणि फर्स्ट क्लास प्रवाशांना 50 किलोपर्यंत सामानाची परवानगी आहे. एसी 3- टायर, एसी चेअर कार आणि नॉन एसी स्लीपर क्लासमध्ये प्रवास करणाऱ्या प्रवाशांना 40 किलो मोफत सामान नेण्याची परवानगी आहे आणि द्वितीय श्रेणीतील प्रवासी 35 किलोपर्यंत सामान वाहून नेऊ शकतात.

वांद्रे टर्मिनस येथे नुकत्याच झालेल्या चेंगराचेंगरीनंतर, पश्चिम रेल्वेने स्टेशन परिसर आणि प्लॅटफॉर्मवर ड्रम आणि इतर तत्सम वस्तू तसेच मोठ्या आकाराच्या वस्तूंवरही बंदी घालण्यात आली आहे. 29 ऑक्टोबर रोजी विभागीय व्यावसायिक व्यवस्थापकाने पश्चिम रेल्वेच्या मुंबई सेंट्रल विभागातील सर्व तिकीट तपासकांना एका पत्राद्वारे हा निर्णय कळवला आहे. सणासुदीच्या हंगामामुळे प्रवाशांच्या लक्षणीय गर्दीच्या दरम्यान हा निर्णय घेण्यात आला आहे.

या निर्देशात असे अधोरेखित करण्यात आले आहे की, मोठ्या आणि अवजड सामानामुळे गर्दी होत आहे आणि प्रवाशांच्या सुरळीत प्रवाहात अडथळा निर्माण होत आहे, यामुळे गर्दी व्यवस्थापन गुंतागुंतीचे होत आहे. सर्व तिकीट तपासणी कर्मचाऱ्यांना अशा सामनाच्या बंदीची एंट्री पॉईंट्सवर काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. (हेही वाचा: Bandra Terminus Stampede: वांद्रे टर्मिनसवरील चेंगराचेंगरीनंतर पश्चिम रेल्वेचा मोठा निर्णय; प्रवाशांच्या गर्दीचा सामना करण्यासाठी सुरु केल्या अनारक्षित फेस्टिव्हल स्पेशल ट्रेन्स)

पत्रानुसार, स्थानक आणि पथक प्रभारींना या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करण्यावर वैयक्तिकरित्या देखरेख करण्याचे काम देण्यात आले आहे. या निर्देशाचे कोणतेही उल्लंघन केल्यास त्याची गंभीर दखल घेतली जाईल. गोरखपूरला जाणाऱ्या अंत्योदय एक्स्प्रेसमध्ये मोठा ड्रम घेऊन चढण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका व्यक्तीच्या व्हायरल व्हिडीओनंतर हा निर्णय घेण्यात आला आहे.