Balasaheb Thorat: महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या शासकीय निवासस्थान Royal Stone बंगल्यात एकाकडून आत्महत्येचा प्रयत्न
या वेळी त्यांनी विशेष कार्यकारी अधिकारी दालनात स्वतःवर पेट्रोल टाकून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. मात्र कर्तव्यावर असलेल्या पोलिसांनी तातडीने दखल घेत त्यांना अडवले आणि पुढील अनर्थ टळला.
राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांचे शासकीय निवासस्थान असलेल्या रॉयल स्टोन ( Royal Stone Bungalow) या बंगल्यातील विशेष कार्यकारी अधिकारी दालनात एका व्यक्तीने आत्महत्येचा प्रयत्न केला. या व्यक्तिने स्वत:च्या अंगावर पेट्रोल ओतून घेत आत्मदहनाचा प्रयत्न केला. मात्र, कर्तव्यावर असलेल्या पोलिसांनी वेळीच पावले टाकत या व्यक्तीला अडवले आणि मोठा अनर्थ टळला. पांडूरंग वाघ असे या व्यक्तीचे नाव आहे. हा व्यक्ती अहमदनगर येथील रहिवासी आहे.
प्राप्त माहितीनुसार, अहमदनगर येथील झापडी गावचे रहिवासी असलेले पांडुरंग वाघ यांनी वाळू उत्खनन आणि वाहतूक परवाना मिळवला होता. हा परवाना त्यांनी 2018 मध्ये मिळवला होता. हा परवाना मिळविण्यासाठी या व्यक्तीने सरकारकडे 8लाख 72 हजार रुपये भरले होते. त्यानंतर त्यांना हा परवाना मिळाला आणि त्यांनी वाळू उपसा सुरु केला. मात्र, स्थानिकांनी विरोध केल्याने त्यांना वाळू उपसा करताच आला नाही. त्यामुळे आपले वारंवार नुकसान होत राहिले असे वाघ यांचे म्हणने होते.
शासनाकडून वाळू उपासा करण्याचे कामही त्यांना स्थानिकांच्या विरोधामुळे करता येत नव्हते, असे त्यामुळे आपल्याला प्रचंड आर्थिक नुकसान सहन करावे लागत आहे, असे वाघ यांचा दावा होता. परिणामी शासनाकडे भरलेले पैसे आपणास परत मिळावे अशी मागणी वाघ यांनी केली होती. त्यासाठी त्यांनी सरकारकडे पाठपुरावाही केला होता. (हेही वाचा, Mumbai: धक्कादायक! मुंबईच्या दादर भागात गळफास घेऊन एका 15 वर्षीय मुलीची आत्महत्या)
दरम्यान, शासनाकडील पैसे लवकरात लवकर परत यावेत यासाठी पांडुरंग वाघ हे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या निवासस्थानी मंगळवारी आले होते. या वेळी त्यांनी विशेष कार्यकारी अधिकारी दालनात स्वतःवर पेट्रोल टाकून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. मात्र कर्तव्यावर असलेल्या पोलिसांनी तातडीने दखल घेत त्यांना अडवले आणि पुढील अनर्थ टळला. पोलिसांनी पांडुरंग वाघ यांच्यावर सीआरपीसी 41 (1) अंतर्गत कारावाई करत अटक केली. पुढे त्यांची जामीनावर सुटकाही केली.